Wife Hatches plan to steal mobile phone: दिल्लीमध्ये मोबाइलच्या चोरीच्या एका घटनेला अनपेक्षित वळण मिळाले. दक्षिण दिल्लीच्या सुलतानपूर येथे १९ जून रोजी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी २५ वर्षीय युवकाचा फोन हिसकावला. १५ दिवसांनी पोलिसांनी चोरांना बेड्या ठोकून सदर फोन मिळवला. पण त्यानंतर चोरीच्या मागे वेगळाच हेतू असल्याचे धक्कादायक कारण समोर आले. सदर व्यक्तीचा फोन त्याच्या पत्नीनेच चोरी करण्यास सांगितले होते. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले. विवाहबाह्य संबंधावरून हा गुन्हा झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधाचा पुरावा तिच्या पतीच्या मोबाइलमध्ये होता. म्हणून पत्नीने पतीचा मोबाइल चोरी करण्याची आणि त्यातील पुरावा नष्ट करण्याची योजना आखली. पण पोलिसांनी अखेर तिचे बिंग फोडले. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला असून खटल्याच्या तारखांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रकरण काय आहे?
राजस्थानमधील रहिवासी असलेल्या या जोडप्याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नापूर्वीच पत्नीचे शेजारी राहणाऱ्या पुरूषावर प्रेम होते. लग्नानंतरही हे नाते संपले नाही. दोघेही वरचेवर भेटत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी पतीला याची कुणकुण लागली.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड करण्यासाठी पतीने योजना आखली. पत्नी झोपेत असताना पतीने तिचा मोबाइल तपासला आणि त्यात त्याला पत्नी आणि तिच्या प्रियकराचे नको ते फोटो आढळले. यानंतर त्याने ते फोटो पत्नीच्या मोबाइलमधून स्वतःच्या मोबाइलमध्ये घेतले. जेव्हा पत्नीला याची भणक लागली, तेव्हा तिला धक्काच बसला. पती आपले प्रेमप्रकरण कुटुंबियांसमोर उघड करणार या भीतीने पत्नीने त्याचा मोबाइल चोरण्याची योजना आखली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी पुढे सांगितले की, जूनच्या पहिल्या आठवड्यात पत्नीने तिच्या राजस्थानमधील मित्राला मोबाइल चोरी करण्याचे काम दिले. या मित्राने त्याच्या साथीदारासह पतीच्या रोजच्या हालचालींवर पाळत ठेवली. त्यांनी दुचाकी भाड्याने मिळविण्याची आणि हॉटेल बुकिंगची माहिती मिळवली आणि ते परत राजस्थानला गेले. १८ जून रोजी ते पुन्हा दिल्लीत आले आणि त्यांनी १९ जून रोजी पतीचा मोबाइल चोरला.
मोबाइल चोरी झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर फतेहपूर बेरी पोलीस ठाण्यातील प्रमुख राजेश शर्मा यांनी सदर प्रकरणाचा कसून तपास केला. ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यातून दुचाकीचा क्रमांक आणि ती कुठून भाड्याने घेतली होती, याची माहिती मिळाली. दुचाकी ज्या ठिकाणाहून भाड्याने घेतली होती, त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर चोर राजस्थानहून आल्याचा पुरावा मिळाला.
राजस्थानहून दिल्लीत येण्याचा खर्च, भाड्याने घेण्यासाठी खर्च केलेली रक्कम यावरून ही चोरी केवळ पैशांसाठी झालेली नसल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर दिल्ली पोलिसांनी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात धडक देत दोन चोरांपैकी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइलही हस्तगत केला. त्यानंतर या प्रकरणातील खरी माहिती समोर आली.