छत्तीसगडमधील विजापूर व बस्तर जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांनी शनिवारी एक तासाच्या अंतराने केलेल्या दोन हल्ल्यांत १३ जण ठार झाले. यात जवान प्रवास करीत असलेल्या रुग्णवाहिकेवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यात पाच जवान शहीद झाले असून चार जवान जखमी झाले आहेत. तर या हल्ल्याआधी नक्षलवाद्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांची बस उडवून दिली. त्यात सात कर्मचारी मृत्युमुखी पडले तर सहाजण जखमी झाले.
केतुलनार नजीक शनिवारी सकाळी ११ वाजता मतदान कर्मचाऱ्यांचे पथक मतदानाच्या कामानंतर परत जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांची बस उडवून दिली, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक आर. के. वीज यांनी सांगितले. नक्षलग्रस्त बस्तर मतदारसंघात १० एप्रिलला मतदान झाले होते. निवडणूक कर्मचारी जेव्हा केतुलनार येथे एका तळ्याजवळ पोहोचले तेव्हा गुडमा व कुत्रू दरम्यान सुरूंगाचा स्फोट झाला; त्यात सहा निवडणूक कर्मचारी जागीच ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात पळाले. जंगलातून मृतदेह व जखमींना आणण्यासाठी कुमक पाठवण्यात आली.  त्यानंतर लगेच १०० कि.मी. अंतरावर नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्रवास करीत असलेली संजीवनी रूग्णवाहिका दर्भा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उडवून दिली. ही घटना कमानक खेडय़ात घडली.
नियमांचे उल्लंघन भोवले
नक्षलग्रस्त भागांतून प्रवास करताना जवानांनी लष्करी बंदोबस्ताचीच वाहने वापरावीत, या नियमाचे उल्लंघन झाल्यानेच जवानांना प्राण गमवावा लागला, असे सुरक्षा दलाच्या गोटातून सांगण्यात आले. लष्करी वाहने ही स्फोट व गोळीबारातही तग धरतात. मात्र रुग्णवाहिकेत आपण आहोत, हे नक्षलवाद्यांना कळणार नाही, हा त्यांचा कयास खोटा ठरला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maoists target teachers ambulance 13 killed
First published on: 13-04-2014 at 04:53 IST