नवी दिल्ली : राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन ‘मऱ्हाटी माणसा’ला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी मराठी खासदारांनी अद्दल घडवली. संसदभवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संसदभवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला.
मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे’ असे आव्हान दुबे यांनी दिले होते. भाजपच्या या वाचाळवीर खासदाराला बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
“मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही… मराठी भाषकांविरोधातील तुमची ही आरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावले. त्यांचा हा उग्रावतार पाहून अन्य राज्यातील खासदारांना नेमके काय घडले, तेच समजेना! ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी लॉबी दणाणून गेल्यानंतर कँटिनकडे निघालेले अन्य मराठी खासदारही तेथे पोहोचले आणि दुबे यांना जाब विचारू लागले.
अखेर दुबे यांना तिथून निघून जावे लागले. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या घडामोडींचीच त्यानंतर संसदभवन परिसरात चर्चा होती. विशेष म्हणजे, हे सगळे नाट्य घडत असताना लॉबीमध्ये असलेल्या महायुतीच्या मराठी खासदारांच्या चेहऱ्यावरही हलकेसे हसू उमटल्याचे दिसले.
काही वेळाने दुबे कँटिनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांना हटकले व नेमके काय घडले असे विचारले. त्यांना उत्तर देण्याचे टाळून दुबे निघून गेले. त्याच वेळी काही पत्रकारांनी गायकवाड यांना गाठून लॉबीत घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावर आपण दुबेंना जाब विचारल्याचे त्यांनी सांगितले. नेमके त्याच वेळी दुबेदेखील तेथे आले. गायकवाड यांनी लगेचच पुन्हा ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावर ‘आप तो मेरी बहन है,’ असे म्हणत हात जोडून दुबे तिथून निघून गेले…
आम्ही विधानसभेत काम केलेले आहे. आमचा तळागाळातील लोकांशी संपर्क असतो. दुबेंनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का दिला आहे. हे आम्ही कसे खपवून घेणार? आम्ही संसदेतही मराठीचा आवाज बुलंद करू. आम्ही गप्प बसणार नाही. – वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस