Mark Zuckerberg Sorry Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी गेल्या आठवड्यातच अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या टेक दिग्गजांची व्हाईट हाऊस येथे डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी जवळपास सर्वच मोठ्या कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. त्यात बिल गेट्स, टिम कूक, मार्क झकरबर्ग आणि सुंदर पिचई यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी या सर्वांमध्ये फेसबुकचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांना आपल्या बाजूला बसवून घेतलं. याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी झकरबर्ग यांना विचारलेल्या एका प्रश्नावर झकरबर्ग यांनी दिलेल्या उत्तराप्रमाणेच नंतर त्यांनी त्याबाबत ट्रम्प यांच्याशी साधलेला ‘ऑफ द रेकॉर्ड’ संवादही रेकॉर्ड झाला!
नेमकं काय घडलं?
वॉशिंग्टनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीसाठी आलेल्या मान्यवरांपैकी मार्क झकरबर्ग यांच्याशी ट्रम्प यांच्या झालेल्या संवादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पार्टीमध्ये चर्चा करता करता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजूला बसलेल्या झकरबर्ग यांना एक प्रश्न केला. “पुढच्या काही वर्षांत तुम्ही अमेरिकेत किती भांडवल गुंतवणार आहात?” असं ट्रम्प यांनी विचारलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आलेल्या या प्रश्नामुळे झकरबर्ग जरा गडबडले. पण मग लागलीच स्वत:ला सावरून त्यांनी त्यावर ६०० बिलियन डॉलर्स इतका भलामोठा आकडा सांगितला. “ओह्ह… मला वाटतं २०२८ पर्यंत ही रक्कम जवळपास ६०० बिलियन डॉलर्स इतकी असू शकेल”, असं झकरबर्ग म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अॅपलनं अमेरिकेत तितक्याच गुंतवणुकीची घोषणा केली आहे. झकरबर्ग यांच्या या उत्तरावर ट्रम्प यांनी “ही बरीच मोठी रक्कम आहे”, असा प्रतिसाद दिला.
हॉट माईकमध्ये रेकॉर्ड झालं वास्तव!
दरम्यान, या सगळ्या संवादानंतर मार्क झकरबर्ग हळूच डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागून म्हणाले, “सॉरी, मी तुमच्या प्रश्नासाठी तयार नव्हतो. मला नेमकं कळत नव्हतं की तुम्हाला नेमकी किती भांडवली गुंतवणूक अपेक्षित आहे”, असं मार्क झकरबर्ग म्हणाले. त्यांच्या या उत्तरानंतर डोनाल्ड ट्रम्प या मोठ्या कंपन्यांशी करत असलेल्या पडद्यामागच्या चर्चांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अलिकडेच ट्रम्प यांनी इतर देशांवर टॅरिफ लागू केल्यानंतर आता अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या या कंपन्या ट्रम्प यांच्या निशाण्यावर असल्याचं बोललं जात आहे.
ट्रम्प यांनी सगळ्यांनाच विचारला तोच प्रश्न
डोनाल्ड ट्रम्प यांनी पार्टीसाठी आलेल्या सर्वच कंपन्यांच्या प्रमुखांना हाच प्रश्न विचारला. यावर प्रत्येकाने आपापल्या नियोजानुसार गुंतवणुकीचे आकडे सांगितले. त्यानुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी १०० बिलियन आणि पुढच्या दोन वर्षांत ही गुंतवणूक २५० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचा मानस बोलून दाखवला. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलला यांनी ८० बिलियन डॉलर्सचं नियोजन असल्याचं सांगितलं. ही सर्व गुंतवणूक प्रामुख्याने पुढील काळात अधिकाधिक विकसित होणाऱ्या AI सारख्या तंत्रज्ञानाच्या गरजा भागवण्यासाठी मोठमोठ्या डेटा सेंटर्समध्ये केली जाणार आहे.
मस्क यांना निमंत्रणच नाही
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सावलीप्रमाणे डोनाल़्ड ट्रम्प यांच्या पाठिशी असणारे ‘एक्स’चे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचे नंतर मात्र राष्ट्राध्यक्षांशी मतभेद झाले. हे मतभेद या दोघांनी उघडपणे जगासमोर बोलूनदेखील दाखवले. या पार्श्वभूमीवर मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी असणारे आर्थिक वा राजकीय असे सर्वच संबंध जाहीररीत्या तोडले. त्यामुळे ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये बोलावलेल्या टेक दिग्गजांच्या डिनर पार्टीसाठी एलॉन मस्क यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेलं नसल्याचं बोललं जात आहे. या पार्टीसाठी एलॉन मस्क यांची अनुपस्थिती सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली होती!