तुम्हाला जिप्सी कार आठवते आहे का? पांढऱ्या रंगाची हुड नसलेली असो किंवा कशीही असो ती आवडण्याचे मुख्य कारण होते तिचा आकर्षून घेणारा लुक. काही वर्षांपूर्वी या कारची प्रचंड क्रेझ होती. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसलेल्या कारची निर्मिती मारुती सुझुकी कंपनीने थांबवली आणि सगळ्यांचीच निराशा झाली. तसेच ही कार पोलीस दल आणि लष्करासाठी राखीव झाल्यानेही अनेकांना ती घेता आली नव्हती. मात्र आता हीच कार नव्या ढंगात आणण्याच्या तयारीत मारुती सुझुकी कंपनी आहे असे समजते आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
सध्या SUV कार्सची चलती आहे, अशात बाजारात जिप्सी या आपल्याच जुन्या कारचा नवा अवतार सादर करण्याची तयारी मारुती सुझुकीने सुरु केली आहे. ‘नेक्स्ट जनरेशन’ जिप्सी आणण्यासाठी आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. मात्र याबाबत तूर्तास काही सांगता येणार नाही असे जिप्सी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर केनिची आयुकावा यांनी स्पष्ट केले आहे. आमच्या आधीचा कारला भारतात मिळालेला प्रतिसाद भरघोस होता त्यामुळे आता याच ब्रँडची कार नव्या अवतारात आणण्याचे आम्ही ठरवले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
जिप्सीची जेव्हा विक्री सुरु झाली तेव्हा आम्हाला जाणवले की अनेक लोक कार घेताना जिप्सीलाच पहिली पसंती देत आहेत. इतर पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत ही कार सरस ठरली होती. त्यामुळे या कारचा नवा अवतारही लोकांना आवडेल असेही केनिची आयुकावा यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कर आणि पोलीस यांनी आम्हाला केलेल्या मागणीनुसार आम्ही जिप्सी कारची निर्मिती करतो. मात्र तरुणाईला ही कार ठाऊक व्हावी म्हणून आम्ही ही कार नव्या अवतारात आणण्याच्या तयारीत आहोत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.