मथुरा : मथुरेतील कटरा केशवदेव मंदिरालगत असलेल्या परिसरातून शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यायोग्य असल्याचे मथुरा जिल्हा न्यायालयाने गुरुवारी सांगितले. या निर्णयामुळे, यापूर्वी ही याचिका फेटाळून लावणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाला तिची सुनावणी करणे अनिवार्य झाले आहे.

 ही याचिका मुळात ‘भगवान श्रीकृष्ण विराजमान यांचे जवळचे मित्र’ या नात्याने लखनऊ येथील रंजना अग्निहोत्री व इतर सहा जणांनी कनिष्ठ न्यायालयात- वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात- २५ सप्टेंबर २०२० रोजी दाखल केली होती.

शाही ईदगाह मशीद ही श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टच्या मालकीच्या १३.३७ एकर जागेच्या एका भागावर उभारण्यात आली असल्याचा दावा करतानाच; ही मशीद हटवण्यात यावी व जागा ट्रस्टला परत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

 तथापि, ही याचिका स्वीकारार्ह नसल्याचे सांगून वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांनी ३० सप्टेंबर २०२० रोजी ती फेटाळून लावली होती. या आदेशाचा फेरविचार करावा या मागणीसाठी याचिकाकर्त्यांनी नंतर जिल्हा न्यायाधीशांकडे दाद मागितली होती.

 ‘जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचे पुनरीक्षण मान्य केले असून, हा नियमित दावा म्हणून दाखल करून घेणयाचे निर्देश कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत’, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील संजय गौर यांनी दिली.

 या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव भारती यांनी गुरुवारी फेरविचार याचिका मान्य केली. याचाच अर्थ, मूळ दाव्याची आता कनिष्ठ न्यायालयाला सुनावणी करावी लागेल, असे न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘याचिकाकर्त्यांना  खटला दाखल करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे’, असे या दाव्यात याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे अ‍ॅड. हरिशंकर जैन यांनी सांगितले.