India vs Pakistan Operation Sindoor Latest Updates : पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले सुरू असून काल रात्री त्यांनी उधमपूर, पठाणकोट आणि भटिंडा येथील भारतीय हवाई तळांवर हल्ले केले, अशी माहिती आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ही माहिती दिली. 

तसंच, पाकिस्तानने नागरी विमानांच्या आडून हल्ले केले असून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावला असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. तर, पाकिस्तानने काही खोट्या बातम्या पसरवल्या असून त्यामध्ये भारताची एस-४० यंत्रणा पाकिस्तानने निष्क्रिय केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र, हा दावा खोटा असल्यांही भारत सरकारने आज स्पष्ट केलं.

पाकिस्तानकडून २६ ठिकाणांहून घुसखोरीचा प्रयत्न

“पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे, त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. पण भारताने पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावले. तरीही पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर आमच्या उपकरणे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान केले. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. त्यांनी आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पाकिस्तानकडून फेक न्यूजचा भडिमार

“भारताने पाकिस्तानवर जलद आणि संयमी प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने भारतीय एस-४०० प्रणाली नष्ट केल्याचे, सुरत आणि सिरसा येथील हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचे दावे करून, सतत चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे… पाकिस्तानने पसरवलेल्या या खोट्या दाव्यांचे भारत स्पष्टपणे खंडन करतो”, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

पाकिस्तानचे सैन्य सरकले

“पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य पुढच्या भागांकडे हलवले आहे, यामुळे तणाव आणखी वाढत जाणार असल्याचे संकेत आहेत. भारतीय सशस्त्र दल अजूनही उच्च ऑपरेशनल तयारीत आहेत आणि सर्व शत्रुत्वाच्या कृतींना प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे आणि प्रमाणानुसार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तानने योग्य प्रतिसाद दिला तर हा तणाव न वाढवण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येणार आहे”, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पाकिस्तानने जाणूनबुजून हवाई तळांना लक्ष्य केल्यामुळे भारतीय सशस्त्र दलांनी जलद आणि सुनियोजित प्रत्युत्तर कारवाई केली. रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांना हवाई प्रक्षेपण, अचूक दारूगोळा आणि लढाऊ विमानांद्वारे लक्ष्य केले गेले. पसरूरमधील रडार साइट आणि सियालकोटमधील विमान तळाला देखील अचूक दारूगोळा वापरून लक्ष्य केले गेले. या कारवाई दरम्यान भारताने कमीत कमी नुकसान करण्याचा प्रयत्न केला.