मेरठमध्ये एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात जंगली प्राण्यांचे तब्बल ११७ किलो मांस, प्राण्यांची डोकी, शिंगे आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. महसूल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय), वनखाते आणि सीमाशुल्क व अबकारी खात्याच्या पथकांनी शनिवारी निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार यांच्या घरावर संयुक्तपणे हा छापा टाकला. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही कारवाई तब्बल १६ तास सुरू होती. या कारवाईनंतर महसूल गुप्तवार्ता विभागाकडून देवेंद्र कुमार यांच्या मुलाला दिल्ली येथील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

या कारवाईत देवेंद्र कुमार यांच्या घरातून तब्बल २५ बंदुका आणि ५० हजार काडतुसेही जप्त करण्यात आल्याची माहिती डीआरआयचे अतिरिक्त संचालक राज कुमार दिग्विजय यांनी दिली. तसेच मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचे अवशेषही जप्त करण्यात आले. यामध्ये काळवीट आणि बिबट्याची कातडी, सांबार व काळवीटाची डोकी, हरणांच्या सहा डोक्यांसह शिंगे, सांबराची शिंगे, सात अन्य प्राण्यांचे दात, हस्तिदंती मुठ असलेला चाकूचा समावेश आहे. तसेच देवेंद्र कुमार यांच्या घरात तब्बल ४५ पिशव्यांमध्ये ११७ किलो मांस फ्रिजमध्ये भरून ठेवल्याची माहिती मेरठच्या विभागीय वन अधिकारी अदिती शर्मा यांनी दिली. सध्या हे मांस तपासणीसाठी डेहराडून येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

सध्या देवेंद्र कुमार यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस तपासात देवेंद्र कुमार हे राष्ट्रीय स्तरावरचे नेमबाज असल्याचीही माहिती पुढे आली आहे. ते सध्या एक सुरक्षा एजन्सी चालवत होते. भारतामध्ये व्यवसायिक नेमबाजांना प्रशिक्षणासाठी एका मर्यादेपर्यंतच शस्त्रे आयात करण्याची परवानगी आहे. काही दिवसांपूर्वी मेरठ आणि दिल्लीमध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून तब्बल २५ शस्त्रे जप्त करण्यात आली होती. मात्र, ही शस्त्रे कुठून आणली याचे समाधानकारक स्पष्टीकरण हे तिघेही देऊ शकले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी या टोळक्याच्या घरी छापा टाकला असता १०० बंदुका आणि दोन लाख काडतुसे एवढा मोठा साठा हस्तगत करण्यात आला होता. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये दिल्लीतील सहा आणि मेरठमधील एका ठिकाणाचा समावेश आहे.