Meerut Saurabh Rajput Murder Case : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली. सौरभ राजपूत असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून ही हत्या केली. तसेच मृतदेहाचे १५ तुकडे करत एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंट काँक्रिटसह पुरले. या प्रकरणात आता दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केलं असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची आता कसून चौकशी सुरु आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या का केली? ही हत्या कशी केली? हत्या करताना कशाचा वापर केला? यात आणखी कोणाचा सहभाग आहे क? असा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. सौरभ राजपूत यांच्या हत्या प्रकरणाचा आता शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या शवविच्छेदन अहवालामधून आता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

शवविच्छेदन अहवालात असं दिसून आलं आहे की, सौरभ राजपूतची हत्या दोन आठवड्यांपूर्वीच करण्यात आली होती. तसेच त्याची त्वचा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशी माहिती शवविच्छेदन अहवालामधून समोर आली आहे. या संदर्भात मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ.अशोक कटारिया यांनी माहिती देताना सांगितलं की, “शवविच्छेदन अहवालातून असं दिसून आलं की, सौरभची हत्या दोन आठवड्यांपूर्वी झाली होती. तसेच त्याची त्वचा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्वचेला गंभीर नुकसान करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मृतदेहाचे अनेक भाग कापलेले होते. त्याचे दात देखील हालत होते आणि त्याची त्वचा खूप सैल झाली होती”, अशी माहिती त्यांनी दिलं.

दरम्यान, मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तुरुंग प्रशासनाचे वरिष्ठ अधीक्षक वीरेश राज शर्मा यांनी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्लाबाबत माहिती देताना सांगितलं की, “मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना बुधवारी संध्याकाळी ६ वाजता तुरुंगात आणण्यात आलं. मुस्कानला महिलांच्या बराकमध्ये ठेवण्यात आलं आहे, तर साहिलला पुरुषांच्या बराकमध्ये ठेवण्यात आलं आहे. मुस्कान गप्प राहिली, तिने कोणाशीही संवाद साधला नाही. तसेच तिने दिलेले अन्नही खाल्ले नाही”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियकरामुळे मुस्कानला अंमली पदार्थाचे व्यसन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानचा प्रियकर साहिल शुक्ला अंमली पदार्थांचे व्यसन करत होता. त्याने मुस्कानलाही या व्यसनाची सवय लावली होती. दोघेही भेटल्यानंतर अंमली पदार्थाचे सेवन करत असत. या व्यसनामुळेच तिला साहिलला सोडायचे नव्हते. सौरभ राजपूत याला विरोध करेल, या भीतीपोटी दोघांनी त्याला संपविण्याचा कट रचला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.