पंतप्रधान मोदींसमवेत काश्मिरी नेत्यांची आज बैठक, ८ पक्षांचे नेते असतील हजर

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या ८ राजकीय पक्षांच्या १४ लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत.

Meeting of Kashmiri leaders with Prime Minister Modi today
पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता होणार बैठक

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या ८ राजकीय पक्षांच्या १४ लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत. सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दुपारी ३ वाजता बोलावलेल्या बैठकीचा अजेंडा गुप्त ठेवण्यात आला आहे. मात्र, सरकार जम्मू-काश्मीरच्या विकासासह सीमांकन व इतर मुद्द्यांवर स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

पंतप्रधानांव्यतिरिक्त या बैठकीत गृहराज्यमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, गृहसचिव अजय भल्ला आणि काही उच्च अधिकारी या बैठकीला उपस्थित राहू शकतात.

हेही वाचा- लशींसाठी पंतप्रधानांचे जाहीर आभार माना!

बैठकीस एकूण १४ प्रतिनिधींना बोलविण्यात आले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद, गुलाम अहमद मीर, ताराचंद, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, भाजपाचे निर्मल सिंग, कवींदर गुप्ता आणि रवींद्र रैना, पीपल्स कॉन्फरन्सचे मुझफ्फर बेग आणि सज्जाद लोणे, पँथर्स पार्टीचे भीम सिंग, सीपीआयएमचे एमवाय वाय. आणि जेके अपनी पक्षाचे अल्ताफ बुखारी यांना बैठकीस आमंत्रित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेऊन काश्मीरवर राजकीय पक्षांशी चर्चा करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर दोनदा सरकार स्थापनेची ऐतिहासिक सुरुवात पंतप्रधान मोदींनी केली आहे.

बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अलर्ट 

पंतप्रधान मोदींच्या या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे, राज्यात ४८ तासांचा अल्र्ट जारी करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवरही लक्ष ठेवले गेले आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास इंटरनेट सुविधेवरही बंदी घातली जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे बुधवारी पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला होता.

कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा

कलम ३७० रद्द झाल्यानंतर प्रथमच जम्मू-काश्मीरसंदर्भात राज्यातील पक्षांसह केंद्र सरकारकडून राजकीय पुढाकार घेण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्यत्व देण्याबाबत, राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याबाबत आणि अन्य मुद्द्यांविषयी चर्चा होऊ शकते. परंतु, बैठकीबाबत निश्चित अजेंडा सांगितलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Meeting of kashmiri leaders with prime minister modi today srk