मेघालयात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. मात्र काँग्रेसच्या पाच आमदारांसह एकूण ८ आमदारांनी विधानसभेतून आमदारांनी राजीनामा दिला. या नावांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रोवेल लिंगदोह यांचाही समावेश आहे. तसेच राजीनामा दिलेल्या पाचही काँग्रेस आमदारांनी ‘नॅशनल पिपल्स पार्टी’ या NDA सोबत असलेल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांतच मेघालय विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जातो आहे.

आमदारकीचा राजीनामा दिलेल्या पाचही काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्याविरोधात दंड थोपटले होते. तसेच पक्षाचे नेतृत्त्वही अमान्य केले होते. त्यामुळे या पाचपैकी चार जणांची मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमधून हकालपट्टीही केली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रॉवेल यांनी आठ आमदारांनी ‘नॅशनल पिपल्स पार्टी’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. राजीनामा दिलेल्या ८ आमदारांपैकी दोघेजण अपक्ष आमदार आहेत तर १ आमदार डेमोक्रेटिक पार्टीचा आहे. तर पाच आमदार काँग्रेसचे आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या नॅशन पिपल्स पार्टीच्या रॅलीमध्ये हे सगळेजण सहभागी होणार आहेत.