मेहबूबा मुफ्ती यांची मुख्यमंत्रिपदी निवड; पीडीपी-भाजप युती अभेद्य
मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर निर्माण झालेला जम्मू-काश्मीरमधील सत्तेचा तिढा सुटला असून सईद यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होणार आहेत. पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाने त्यांची एकमताने निवड केली आहे. मेहबूबा या काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत.
मुफ्ती मोहम्मद सईद यांचे जानेवारीत निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाने (पीडीपी) भाजप युतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप करत सरकार स्थापण्यास नकार दिला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पाश्र्वभूमीवर काश्मिरात राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. दरम्यानच्या काळात भाजप आणि पीडीपी यांच्यात सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू होती. मात्र, पीडीपीच्या अनेक अटी भाजपने नाकारल्या होत्या. अखेरीस मंगळवारी मेहबूबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पेच सोडवला. गुरुवारी झालेल्या पीडीपीच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मेहबूबा यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद सोपवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. आमदारांनी केलेल्या निवडीबद्दल मुफ्ती यांनी त्यांचे आभार मानले. त्या आज, शुक्रवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. पीडीपी व भाजप यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, त्यांचे संख्याबळ समाधानकारक असल्याने ही केवळ औपचारिकताच असेल.

मेहबूबांसमोरील आव्हान
मेहबूबा यांच्यासमोरील प्रमुख आव्हान भाजपसोबतच्या आघाडीला विरोध असणाऱ्या पीडीपीतील एका गटाला एकत्र ठेवण्याचे आहे. अतिशय वादग्रस्त अशा मुद्दय़ांवर वडिलांपेक्षा अधिक काश्मीरवादी भूमिका घेण्यासाठी मेहबूबा ओळखल्या जातात. दरम्यान, मेहबूबा यांच्या कुठल्याही नव्या अटी आम्ही स्वीकारलेल्या नाहीत, असे त्यांच्यासोबत सविस्तर वाटाघाटी करणारे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले आहे. पीडीपीने डिसेंबर २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमधील निवडणूक जिंकल्यानंतर राज्य चालवण्यासाठी काहीशी असंभव वाटणारी आघाडी स्थापन केली होती.