फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याचे लवकर प्रत्यार्पण करून त्याला भारताकडे सोपवावे, या मागणीसाठी भारत सरकार डॉमिनिका सरकारशी सतत संपर्कात आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

चोक्सी याच्या डॉमिनिकातील कथित बेकायदेशीर प्रवेशाबाबतची सुनावणी डॉमिनिकातील मॅजिस्ट्रेट कोर्टाने २५ जूनपर्यंत लांबणीवर टाकली असल्याचे वृत्त तेथील स्थानिक माध्यमांनी या आठवड्याच्या सुरुवातीला दिले होते.

चोक्सी हा अद्याप डॉमिनिक प्रजासत्ताकातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘चोक्सीला आमच्या देशात कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी त्याचे लवकर प्रत्यार्पण करून त्याला भारताच्या ताब्यात द्यावे याकरता भारत सरकार डॉमिनिक सरकारशी सतत संपर्क साधून आहे’, असे ते म्हणाले.