मराठी नवकवितेला नवे परिमाण देणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी प्रादेशिक भाषेची मर्यादा कधीच ओलांडली होती. ‘बोलगाणी’ म्हणून काव्यप्रांताच्या ‘धारानृत्या’त रसिकांना चिंब भिजवणारा ‘जिप्सी’ सर्वच भाषांमध्ये परिचित होता. ते प्रतिभेची अपूर्वाई लाभलेले कवी होते, अशा शब्दांत देशभरातील नामवंत साहित्यिक, कवींनी पाडगावकरांना आदरांजली वाहिली. त्यांच्या कलात्म जीवनाला ‘सलाम’ करीत ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी श्रद्धासुमन अर्पण केले. देशभरातील नामवंत साहित्यिकांनी ‘दै. लोकसत्ता’शी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली.
वाजपेयी म्हणाले की, तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्राची शाखा म्हणून पाडगावकर मला परिचित होते. त्यांच्या जाण्याने केवळ मराठीच नव्हे तर भारतीय कवितेचे नुकसान झाले आहे.
साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित मल्याळम कवी के. सत्चिदानंदन म्हणाले की, कुसुमाग्रजांनंतर मराठी काव्यसृष्टीला पाडगावकरांनी समृद्ध केले. त्यांचे समकालीन भारतीय कवितेतील स्थान अढळ आहे. मराठी कवितेला मोठे करण्यात व त्यातील संवेदनशीलता वाढविण्यात पाडगावकरांचे सर्वाधिक योगदान आहे.
उत्तराखंडमधील कवी मंगेश डबराल यांनी सुमारे तीन दशकांपूर्वी पाडगावकरांशी झालेल्या भेटीला उजाळा दिला. २५ ते ३० वर्षांपूर्वी मराठी साहित्यिकांपैकी मला माहीत असलेल्या नावांमध्ये पाडगावकरांचे नाव वर होते. त्यांच्या एक-दोन कविता मी समजून घेतल्या होत्या. त्यात नावीन्यपूर्ण अद्भुतता होती. पत्रकार, कवी राजेंद्र धोडपकर म्हणाले की, बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतर देशातील समस्त भाषांमध्ये सर्वाधिक परिचित असलेले नाव मंगेश पाडगावकरांचे होते.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2015 रोजी प्रकाशित
देशभरातील साहित्यिकांचा ‘सलाम’
मराठी नवकवितेला नवे परिमाण देणारे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी प्रादेशिक भाषेची मर्यादा कधीच ओलांडली होती.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2015 at 03:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memories of mangesh padgaonkar