Dowry Death: ग्रेटर नोएडामध्ये झालेली हुंडाबळीची घटना चांगलीच चर्चेत आली आहे. निक्की नावाच्या विवाहितेला तिच्या पतीने म्हणजेच विपिनने मारलं आहे. या घटनेबाबत विविध पैलू समोर येत आहेत. दरम्यान आता निक्कीच्या वडिलांनी विपिनचं एन्काऊंटर करा अशी मागणी केली आहे, तर निक्कीच्या आईने माझ्या लाडक्या मुलीला त्यांनी मारलं म्हणत खंत व्यक्त केली आहे.
निक्कीच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?
माझ्या मुलीला कट रचून ठार करण्यात आलं आहे. जे आरोपी आहेत त्यांचं एन्काऊंटर झालं पाहिजे. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं पाहिजे. तसं घडलं नाही तर आम्ही उपोषणाला बसू. योगी सरकार राज्यात आहे. आमची विनंती आहे की निक्कीला ज्यांनी मारलं त्यांचं एन्काऊंटर झालं पाहिजे. निक्कीचे वडील म्हणाले, मी विपिनला बुलेट दिली, स्कॉर्पिओ गाडी दिली. हुंडाही दिला. तरीही त्याने माझ्या मुलीला ठार केलं. माझ्या मुलीला कट रचून ठार मारण्यात आलं आहे. तिची हत्या हा पूर्वनियोजित कट आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असंही निक्कीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

निक्कीच्या आईने काय म्हटलं आहे?
“माझी लाडकी मुलगी हे जग सोडून निघून गेली.” असं निक्कीच्या आईने रडत रडत म्हटलं आहे.निक्कीला तिच्या नवऱ्याने म्हणजेच विपिनने जाळून मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत विपिन, त्याचे आई-वडील आणि त्याचा भाऊ अशा एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. निक्कीकडून आणखी हुंडा हवा होता म्हणून तिचा छळ करण्यात येत होता. तिला दोन दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने जाळून मारलं असा आरोप आहे. मात्र सगळी परिस्थिती आणि घटना जाणून घेतल्यावर निक्कीची आई मंजू यांना मात्र धक्का बसला आहे. मंजू एका बिछान्यावर हताशपणे बसल्या. त्यांना जेव्हा माध्यमांनी निक्कीबाबत विचारलं तेव्हा त्या रडत म्हणाल्या माझी लाडकी मुलगी या जगातून निघून गेली. आता काय मी काय करु? माझ्या मुलीने खूप सहन केलं, तिला ठार मारण्यात आलं आहे. तिला जाळून मारलं आहे. असं त्या डोळ्यांतले अश्रू पुसत माध्यमांना म्हणाल्या.
निक्कीच्या बहिणीने काय आरोप केला?
“आमचा दोघींचाही छळ होत होता. आमच्या सासरचे लोक आम्हाला सांगायचे की ३६ लाख रुपये घेऊन या. गुरुवारी पहाटे १.३० ते ४ च्या दरम्यान माझ्यावरही हल्ला झाला. त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला एका बहिणीसाठी हुंडा मिळाला, पण दुसऱ्याचं काय? आपण पुन्हा लग्न करू, मला अनेक वेळा मारहाण झाली आणि मी दिवसभर शुद्धीवर नव्हते”, असा आरोप तिने केला आहे. “त्याच संध्याकाळी माझ्या मुलांसमोर माझ्या बहिणीवर क्रूरपणे हल्ला केला. माझ्या डोळ्यांसमोर तिला जाळून टाकलं. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मी काहीही करू शकले नाही.