नवी दिल्ली : राजकीय आखणीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाचा घोळ अजूनही संपलेला नसून त्यांच्या सादरीकरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी पक्षाने उच्चाधिकार समिती नेमली. काँग्रेसचे बहुचर्चित चिंतन शिबीर १३ ते १५ मे या तीन दिवसांमध्ये राजस्थानात उदयपूरमध्ये होईल. शिबिरातील विविध विषयांवरील ठरावांसाठी सहा समित्या स्थापन केल्या आहेत.

हंगामी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांचा संभाव्य पक्षप्रवेश व त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे लक्ष्य ठेवून केलेल्या सादरीकरणाचे विश्लेषण करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या अहवालावर सोनिया गांधींच्या उपस्थितीत सोमवारी तातडीने बैठक घेण्यात आली व नवी उच्चाधिकार समिती नेमण्यात आली. काँग्रेसमधील प्रवेशासंदर्भात पक्षनेतृत्वाशी चर्चा करत असतानाच प्रशांत किशोर यांच्या ‘आय-पॅक’ कंपनीने तेलंगणातील सत्ताधारी राष्ट्रीय तेलंगण समितीशी विधानसभा निवडणुकीसाठी करार केला. या घडामोडींमुळे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले असून किशोर यांचा हा करार पक्षीय बांधिलकीच्या आड येत असल्याचे मत या नेत्यांनी बैठकीत मांडले. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात काँग्रेसने कोणतेही भाष्य केले नसले तरी, प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणावरील समितीच्या अहवालावर सखोल चर्चा झाली. तसेच, २०२४च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भातील ध्येय-धरणे ठरवण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमल्याची माहिती राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना दिली. या समितीमध्ये संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल, पी. चिदम्बरम, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश व प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या समावेश आहे.

अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नाना पटोले, मुकुल वासनिक यांची समित्यांवर नियुक्ती

चिंतन शिबिरामध्ये राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती राजकीय ठराव मांडेल. या समितीत बंडखोर गटाचे नेते गुलाम नबी आझाद तसेच, अशोक चव्हाण, शशी थरूर, गौरव गोगोई आदी सदस्य असतील. आर्थिक ठराव माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची समिती मांडेल. या समितीमध्ये सिद्धरमय्या, आनंद शर्मा (जी-२३), सचिन पायलट, प्रणिती शिंदे, राजीव गौडा, गौरव वल्लभ, सुप्रिया श्रीनेत आदी सदस्य असतील. ‘सामाजिक न्याय व सक्षमीकरण’ समितीचे प्रमुख सलमान खुर्शिद असतील. या समितीमध्ये मीरा कुमार, दिग्विजय सिंह, कुमारी सेलजा आदी सदस्य असतील. पक्ष संघटनेशीनिगडीत समितीची जबाबदारी ‘जी-२३’ गटातील मुकुल वासनिक यांच्याकडे देण्यात आली आहे. यामध्ये अजय माखन, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला, रमेश चेन्नीथाला, अधीर रंजन चौधरी आदींचा समावेश आहे. ‘शेती व शेतकरी’ या विषयावरील समितीचे प्रमुखपद ‘जी-२३’मधील भूपेंदर सिंह हुडा यांच्याकडे देण्यात आले आहे. यामध्ये टी. एस. सिंहदेव, शक्तिसिंह गोहिल, नाना पटोले, प्रतापसिंह बाजवा आदी सदस्य असतील. ‘युवा व सक्षमीकरण’ समितीची जबाबदारी अमिरदर सिंग वारिंग यांच्याकडे देण्यात आली असून बी. व्ही. श्रीनिवास, अल्का लाम्बा आदींचा समावेश आहे.