Meta AI Former Employee Internal Email: कंपनी सोडताना, मेटा एआयच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीला एक अंतर्गत ईमेल पाठवला आहे, ज्यामध्ये त्याने कंपनीच्या एआय विभागाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. यात त्याने एआय विभाग भीती आणि गोंधळाने ग्रस्त असल्याचे म्हटले आहे.

द इन्फॉर्मेशन ने पाहिलेल्या ईमेलमध्ये, मेटा एआयचे माजी कर्मचारी टिजमेन ब्लँकव्होवोर्ट यांनी कंपनीच्या संस्कृतीची तुलना संपूर्ण संस्थेत पसरणाऱ्या “मेटास्टॅटिक कॅन्सर” शी केली आहे. ब्लँकव्होवोर्ट मेटाच्या एलएलएएमए मॉडेल्सवर काम करणाऱ्या टीमचा भाग होते.

कंपनी सोडण्यापूर्वी त्यांनी मेटाच्या नेतृत्वावर टीका करणारा एक लांबलचक ईमेल लिहिला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की कंपनीतील अनेक कर्मचारी हरवलेले आणि प्रेरणाहीन वाटत आहेत. “आपण भीतीच्या संस्कृतीत आहोत”, असेही कर्मचाऱ्यांना वाटत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

या माजी कर्मचाऱ्याने अंतर्गत मेलमध्ये म्हटले आहे की, “२००० हून अधिक कर्मचारी असलेल्या एआय विभाग दिशाहीन आहे. मार्ग दाखवण्यासाठी कोणीच नाही. यामुळे पूर्ण विभाग त्रस्त आहे. बहुतेकांना कंपनीत राहणे पसंत नाही. याचबरोबर कर्मचाऱ्यांना त्यांचे ध्येय काय आहे, हे देखील माहित नाही.”

या माजी कर्मचाऱ्याने पुढे दावा केला आहे की, वारंवार होणारे अंतर्गत संघर्ष आणि अस्पष्ट ध्येये यामुळे एआय विभागातील कर्मचाऱ्यांच्या नवोन्मेष क्षमतेला हानी पोहोचत आहे. “हा केवळ बिघाड नाही, हा एक मेटास्टॅटिक कॅन्सर आहे जो संपूर्ण कंपनीवर परिणाम करत आहे”, असे ते म्हणाले.

ओपनएआय आणि गुगल डीपमाइंडसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी मेटा आक्रमकपणे आपल्या एआय ऑपरेशन्सचा विस्तार करत असतानाच माजी कर्मचाऱ्याचा हा अंतर्गत ईमेल चर्चेत आला आहे. कंपनीने अलीकडेच सुपरइंटेलिजेंस लॅब्स नावाचा एक नवीन विभाग सुरू केला आहे, जो आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. याचबरोबर मेटा एआय क्षेत्रातील प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना दरवर्षी लाखो डॉलर्सच्या ऑफरसह नियुक्त करत आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला ब्लूमबर्ग ने वृत्त दिले होते की, अ‍ॅपलच्या फाउंडेशन मॉडेल्स टीमचे पूर्वी नेतृत्व करणारे रुमिंग पँग मेटाच्या नवीन सुपरइंटेलिजेंस विभागात सहभागी होत आहेत. मेटाच्या प्रगत एआय सिस्टीमसाठीच्या प्रयत्नांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.

पँग यांच्यासह मेटाने ओपनएआय, अँथ्रोपिक आणि गुगलमधील संशोधकांना देखील नियुक्त केले आहे, ज्यात युआनझी ली आणि अँटोन बाख्तिन यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हाय-प्रोफाइल नियुक्त्या करूनही, ब्लँकव्होवोर्ट यांच्या टिप्पण्यांवरून असे सूचित होते की मेटाला अजूनही अंतर्गत आव्हानांचा सामना करावा लागत आहे.