मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. केरळमध्ये ई. श्रीधरन यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती केरळ भाजपाचे के. सुरेंद्रन यांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय यात्रेदरम्यान ई. श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००२ रोजी दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली तेव्हा मेट्रोची धुरा ई. श्रीधरन यांच्याकडे होती. त्याचप्रमाणे ई. श्रीधरन यांनी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठीही मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. ई. श्रीधरन हे ८८ वर्षांचे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. श्रीधरन यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळालेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी केलेल्या कामानिमित्त त्यांचा जगभरामध्ये नावलौकिक आहे. २००१ साली त्यांना पद्मश्री तर २००८ साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. २००५ साली फ्रान्स सरकारने त्यांना विशेष पुरस्कार जाहीर केला होता. तर २००३ साली टाइम मॅगझिनने त्यांचा उल्लेख आशियाज हिरो या नामावंत व्यक्तींच्या यादीमध्ये केला होता.

१९५३ साली श्रीधरन यांनी इंजिनियरिंग सर्व्हिस एक्झाम दिली आणि ते दक्षिण रेल्वेमध्ये डिसेंबर १९५४ मध्ये कार्यरत झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या हुशारीच्या जोरावर रेल्वेमध्ये स्वत:ची छाप पाडली. १९६४ साली वादळाच्या तडाख्यामध्ये रेल्वेचा महत्वाचा ब्रिज वाहून गेल्यानंतर तो श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली अवध्या ४५ दिवसांमध्ये उभारण्यात आला. दक्षिण रेल्वेने यासाठी सहा महिन्याचा अवधी दिला असताना श्रीधरन यांनी अवघ्या दीड महिन्यामध्ये हे काम करुन दाखवलं. १९७० ते १९७५ दरम्यान ते कोकण मेट्रो प्रोजेक्टवर काम करत होते. कोकण रेल्वेचा मार्ग कसा बांधता येईल, त्याची रचना कशी असावी तो प्रत्यक्षात कसा साकारता येईल यासंदर्भातील सर्व नियोजन श्रीधरन यांनी केलं. त्यावेळी कोकण रेल्वे हा भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक प्रकल्प होता. मात्र श्रीधरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान अगदी सहज पूर्ण केलं.

बुलेट ट्रेनला दर्शवला होता विरोध

बुलेट ट्रेन ही श्रीमंतासाठी आहे, मात्र भारतात रेल्वेचा दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे. तसेच रेल्वे सुरक्षेवरही भर देण्याची गरज आहे, बहुतांश लोक रेल्वे प्रवासाचा पर्याय निवडतात तो अधिकाधिक सुकर करण्यावर भर दिला पाहिजे असं म्हणत २०१८ साली मेट्रो मॅन इ श्रीधरन यांनी सरकारचे कान टोचले होते. बुलेट ट्रेन खूपच खर्चिक सेवा आहे. सद्यस्थितीत भारताची गरज वेगळी आहे. भारतीय रेल्वेची स्वच्छता, दर्जा, वेग आणि सुरक्षा यामध्ये वेगाने चांगले बदल होणे अपेक्षित आहे असेही त्यांनी म्हटले होते.

राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि उमेदवारीची चर्चा

ई. श्रीधरन यांचे नाव यापूर्वीही अनेकदा राजकारणाशी जोडलं गेलं होतं. २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून ई. श्रीधरन यांचे नाव चर्चेत होतं. कोची मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ई.श्रीधरन व्यासपीठावर एकत्र दिसल्याने या चर्चांना आणखीन जोर धरला होता. मात्र त्याचवेळी भाजपची सत्तेत आल्यानंतरचा एकूणच प्रवास पाहता ‘एनडीए’कडून राष्ट्रपतीपदासाठी अराजकीय व्यक्तीची निवड केली जाण्याची शक्यता फारच धुसर असल्याचे जाणकारांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro man e sreedharan to join bjp scsg
First published on: 18-02-2021 at 13:39 IST