“हा संघराज्यावर थेट हल्ला”; BSF ला देण्यात आलेल्या नवीन अधिकारांमुळे पंजाबमध्ये राजकीय खळबळ

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की राज्यातील शांतता भंग करू नका असे पंजाबच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

Mha increase bsf jurisdiction new political crash Punjab
(सौजन्य : Twitter/Channi)

पंजाब निवडणुकांना काही महिनेच शिल्लक राहिले असताना राज्यातील राजकीय गोंधळ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी कृषी कायद्यांना विरोध आणि नंतर काँग्रेस सरकारमधील गोंधळ, आता पंजाबमधील राजकारण एका नव्या मुद्द्यावर तापले आहे. बुधवारी, केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र तीन राज्यांमध्ये वाढवले ​​आहे, त्यापैकी एक पंजाब देखील आहे. राज्यातील बीएसएफचे कार्यक्षेत्र १५ किमी वरून ५० किमी पर्यंत वाढवण्यात आले आहे, म्हणजेच सीमेपासून भारतीय हद्दीत, बीएसएफ ५० किमीच्या परिघात शोधमोहीम, अटक आणि जप्ती करू शकते, ते सुद्धा कोणत्याही आदेशाशिवाय.

या नव्या आदेशावर मुख्यमंत्री चन्नी यांनी ट्विट करून केंद्राच्या या निर्णयाला विरोध केला आहे. “आंतरराष्ट्रीय सीमेवर चालणाऱ्या ५० किमीच्या परिघात बीएसएफला अतिरिक्त अधिकार देण्याच्या भारत सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो. हा संघराज्यावर थेट हल्ला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा,” अशी मागणी मुख्यमंत्री चन्नी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

तसेच, “आम्ही या निर्णयाचा निषेध करतो. हे संघीय संरचनेचे उल्लंघन आहे आणि पंजाबमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करेल. लोक हे सहन करणार नाहीत. पंजाबने कधीही सांप्रदायिक हिंसा पाहिली नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की राज्यातील शांतता भंग करू नका,” असे पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधावा म्हणाले.

यावरुन पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना प्रश्न विचारला आहे. “तुम्ही काय मागता याची काळजी घ्या! चरणजीत सिंह चन्नी यांनी अनवधानाने अर्धा पंजाब केंद्राकडे सोपवला आहे का? आता पंजाबच्या ५०००० चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी सुमारे २५००० चौरस किमी क्षेत्र बीएसएफच्या अखत्यारीत येईल. पंजाब पोलीस फक्त उभे राहतील. आम्हाला अजूनही राज्यांना अधिक स्वायत्तता हवी आहे, ”असे जाखड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमरिंदर सिंगांकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत

त्याचबरोबर पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसवर नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. “काश्मीरमध्ये आमचे सैनिक मारले जात आहेत. पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांकडून पंजाबमध्ये अधिकाधिक शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आपण पाहत आहोत. बीएसफची वाढलेली उपस्थिती आणि ताकद आपल्याला आणखी मजबूत करेल. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नका,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नव्या आदेशामध्ये काय आहे?

बीएसएफच्या कार्यक्षेत्रात वाढ करून अधिकाऱ्यांना अटक, शोध आणि जप्तीचे अधिकारही देण्यात आले आहेत. हा अधिकार भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या ५० किमीच्या आत बीएसएफला देण्यात आला आहे. आता बीएसएफ दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय आणि वॉरंटशिवाय या अधिकारक्षेत्रात अटक आणि शोध घेऊ शकतो. पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये १५ किमीच्या परिघात शोध आणि अटक करण्याचे अधिकार होते, जे आता वाढवून ५० किमी करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mha increase bsf jurisdiction new political crash punjab abn