विश्वचषकाच्या पुढील सामन्यांत सातत्याने विजय मिळवायचे असल्यास मधल्या फळीतील फलंदाजांनी अधिक जबाबदारीने फलंदाजी करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने व्यक्त केली.
श्रीलंकेचा पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर न्यूझीलंड व अफगाणिस्तानविरुद्ध त्यांच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. ‘‘आमच्या सलामीवीरांनी अफगाणिस्तानविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली. परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळेच दोन्ही सामन्यांत आम्ही पूर्ण ५० षटकेही खेळू शकलो नाही,’’ असे करुणारत्ने म्हणाला.
‘‘उर्वरित विश्वचषकात सुरेख कामगिरी करायची असल्यास मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या योगदानाशिवाय आम्ही जिंकू शकत नाही.’’ असेही करुणारत्नेने सांगितले.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याचा आमच्यावर काहीही परिणाम नाही -सर्फराज
श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी आमच्या खेळाडूंच्या कामगिरीवर याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने व्यक्त केली. त्याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील विजयाचा आत्मविश्वास घेऊनच आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरू, असेही सर्फराजने सांगितले.