पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात बिहारच्या एका कामगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. काश्मीरमध्ये स्थलांतरित कामगाराच्या हत्येची ही चौथी घटना आहे.

बांदीपुरा येथील सोदनारा संबल भागात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिहारच्या मधेपुरातील बेसाढ येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अमरेझ आणि त्याचा मुलगा मोहम्मद जलील यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अमरेझचा श्रीनगरच्या रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अमरेझ याचे बंधू तमहीद यांनी सांगितले,  मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास माझ्या छोटय़ा भावाला गोळीबाराचा आवाज आला. ‘अशा घटना होत असतात, तू झोपी जा,’ असे मी त्याला सांगितले. परंतु, ‘आपला दुसरा भाऊ खोलीत दिसत नसल्याने मी बाहेर पाहून येतो’, असे सांगून माझा छोटा भाऊ जिना उतरला, तर त्याला बाहेर अमरेझ रक्ताच्या थारोळय़ात पडल्याचे दिसले.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांतर्फे दोन लाखांची मदत

दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला मोहम्मद अमरेझच्या कुटुंबीयाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी केली. ही हत्या दुर्दैवी असल्याचे सांगून नितीशकुमार यांनी श्रम विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या योजनांतर्गत त्याच्या कुटुंबीयांना अन्य लाभ देण्याचे निर्देशही दिले आहेत.