श्रीनगरच्या रंगरेथ भागात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका परदेशी दहशतवाद्यासह लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले.

रंगरेथ भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आकस्मिक तपासणी नाके उभारले. श्रीनगर पोलिसांचे एक लहान पथक तैनात असलेल्या अशाच एका नाक्यावरील तपासणीदरम्यान दोन संशयित लोकांनी पोलीस पथकाला पाहून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी याचे चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवाद्यांना जागीच ठार करण्यात आले, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी आदिल अहमद वानी हा शोपियाँतील दरमदुरा येथील रहिवासी होता आणि तो पाकिस्तान प्रशिक्षित ‘अ’ श्रेणीचा दहशतवादी होता. विश्वासार्ह सूत्रांनी सांगितल्यानुसार दुसरा दहशतवादी हा परदेशी होता, मात्र याची खातरजमा करण्यात येत आहे. हे दोघेही लष्कर-ए-तैयब या प्रतिबंधित संघटनेशी संलग्न होते, अशी माहिती या प्रवक्त्याने दिली.

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, हे दहशतवादी अनेक दहशतवादी गुन्ह्यांत आणि नागरिकांवरील अत्याचारात सहभागी होते आणि श्रीनगर शहरात अलीकडेच झालेल्या हत्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गेल्या वर्षी मार्चमध्ये वानी याने त्याच्या सहकाऱ्यांसह सोपोरमधील वारपोरा पोलीस चौकीवर गोळीबार केला. यात वजाहत असदुल्ला हा पोलीस शहीद झाला आणि शबन वागे हा नागरिक मारला गेला होता.