आपल्या देशाची आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी बुधवारी इम्रान खान यांची खिल्ली उडवली. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर अनेक भारतीय राजकारण्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानची अर्थव्यवस्था अनेक देशांच्या, विशेषत: भारतापेक्षा चांगली असल्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
आंतरराष्ट्रीय चेंबर समिट २०२२ च्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना, इम्रान खान म्हणाले की अभूतपूर्व आव्हाने असूनही, पाकिस्तानची आर्थिक स्थिती या प्रदेशातील अनेक देशांपेक्षा, विशेषतः भारतापेक्षा चांगली आहे. “पाकिस्तान अजूनही स्वस्त देशांपैकी एक आहे. ते (विरोधक) आम्हाला सक्षम नसल्याचे म्हणतात पण सत्य हे आहे की आमच्या सरकारने देशाला सर्व संकटांपासून वाचवले आहे. इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये तेलाच्या किमती कमी आहेत, असे इम्रान खा यांनी म्हटले होते. आयएमएफने विनंती केलेल्या अटींनुसार त्यांचे सरकार संसदेत वित्त विधेयक मांडणार आहे असे इम्रान खान यांनी सांगितले. या विधेयकामुळे पाकिस्तानसाठी एक अब्ज डॉलर्सचा मार्ग मोकळा होणार आहे.
त्यानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही याच निमित्ताने निशाणा साधला. होय कारण तुमच्याकडे सिद्धू (काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू) आहेत आणि आमच्याकडे फक्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, युनिकॉर्न्स (एक अब्ज उलाढाल असलेल्या कंपन्या) आणि एफडीआय आहे,” असे राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इम्रान खानला आपला ‘मोठा भाऊ’ म्हणून संबोधले होते, ज्यानंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर सिद्धू पाकिस्तानातील करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देण्यासाठी आले होते.
दरम्यान, भारतासह अनेक देशांच्या तुलनेत या तीन वर्षांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारली असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला होता. जगातील गरीब देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश करणे विरोधकांसाठी योग्य नाही, त्यांच्या सरकारने देशाला अनेक अडचणीतून बाहेर काढले आहे, असेही इम्रान खान म्हणाले होते. महागाईवरून पाकिस्तानातील विरोधक इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. विरोधकही इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.