१६ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाचं केरळमध्ये लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. १५ जणांनी या मुलाचं लैंगिक शोषण केलं आहे. या मुलाची आणि सदर १५ जणांची ओळख डेटिंग अॅपवर झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना अटक केली आहे. यापैकी काही जण फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
केरळच्या कासरगौड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजय भारत रेड्डी यांनी हे सांगितलं की अल्पवयीन मुलाची आणि आरोपींची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली होती. रेड्डी यांनी सांगितलं, “अल्पवयीन मुलाची ओळख १८ वर्षे आणि त्यावरील वयाच्या मुलांशी डेटिंग अॅपवरुन झाली. या अल्पवयीन मुलाकडे स्वतःचा मोबाइल आहे. त्यावर आई वडिलांचं नियंत्रण नाही. त्याने या अॅपवर आपण १८ वर्षांवरील आहोत असं जाहीर केलं. दरम्यान मागच्या दोन वर्षांपासून त्याचं शोषण सुरु होतं.” अशी माहिती रेड्डी यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आणखी काय सांगितलं?
पोलिसांनी सांगितलं आत्तापर्यंत आम्ही या प्रकरणी १४ तक्रारी नोंदवल्या आहेत. तसंच आम्ही ही प्रकरणं कन्नूर, कोझिकोड या ठिकाणी वर्ग केल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. फरार आरोपींचा शोध घेतला जातो आहे. दरम्यान १० जणांची या प्रकरणी चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाच्या आईला त्या मुलामध्ये झालेले शारिरीक बदल लक्षात आले. तिने त्याला विचारलं त्यावेळी त्याने त्याच्यावर झालेल्या अत्याचारांबाबत आईला सांगितलं. शिवाय काय घडलं ते देखील सांगितलं यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. या मुलाचं आता समुपदेशन करण्यात येतं आहे. तसंच राज्य बाल सुरक्षा हेल्पलाइनची मदतही या प्रकरणात घेतली जाते आहे.