आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जैन समाजास आकृष्ट करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने त्यांना सोमवारी अल्पसंख्याकांचा दर्जा बहाल केला. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी योजना व अन्य कार्यक्रमांमधील अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा आता जैन समाजातील व्यक्तींनाही या निर्णयाद्वारे मिळू शकतील. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे रविवारीच यासंबंधी मागणी केली होती. त्यानंतर सोमवारी सरकारने  या निर्णयाची अंमलबजावणी केली.
  देशभरातील जैन समाजाची लोकसंख्या सध्या ५० लाखांच्या घरात असून त्यांना अल्पसंख्याकांचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. जैन समाजातील एका गटाने रविवारीच राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समाजास अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याची मागणी दीर्घकाळ प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर राहुल यांनी तातडीने पंतप्रधानांसमवेत यासंबंधी चर्चा केली.
सरकारच्या या निर्णयामुळे अल्पसंख्याकांचा दर्जा प्राप्त झालेला जैन हा सहावा समुदाय ठरला आहे. याआधी मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बुद्ध व पारशी समाजास अल्पसंख्याकांचा दर्जा लाभला आहे. यासंबंधी लवकरच अधिसूचना जारी करण्यात येईल, असे अल्पसंख्य विभागाचे मंत्री के. रहमान यांनी सांगितले.