उत्तर प्रदेशातील चित्रकूट तुरुंगात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तुरुंगात आमदार अब्बास अन्सारी दररोज आपली पत्नी निखत अन्सारीची गुप्त भेट घेत होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यूपी पोलिसांनी थेट तुरुंगात छापेमारी केली. यावेळी आमदार अब्बास अन्सारीची पत्नी निखत अन्सारी तुरुंगाधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळील एका खासगी खोलीत आढळली आहे. ती दररोज बेकायदेशीरपणे तुरुंगात येऊन ३ ते ४ तास आपल्या पतीला भेटत होती.

याप्रकरणी अब्बास अन्सारीची पत्नी निखत अन्सारी यांना अटक केली आहे. पोलिसांनी निखत अन्सारी यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोबाईल आणि रोख रक्कमेसह इतर अवैध वस्तू आढळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अब्बास अन्सारी यांच्यासोबत, पत्नी निखत अन्सारी, कारागृह अधीक्षक आणि तुरुंगातील इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा तुरुंगात बंद असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी हा मऊ मतदारसंघाचा आमदार आहे. तो सध्या चित्रकूट तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अब्बास अन्सारींची पत्नी निखत मागील अनेक दिवसांपासून दररोज सकाळी ११ वाजता कारागृहात येत होती. ती ३ ते ४ तास आत तुरुंगात पत्नीसोबत घालवल्यानंतर घरी जायची, अशी माहिती पोलिसांनी खबऱ्यांच्या हवाल्याने दिली.

विशेष म्हणजे तुरुंगात जाण्यासाठी निखत कुणाचीही परवानगी घेत नसे. तुरुंगाच्या नोंदवहीतही निखत यांनी तुरुंगात प्रवेश केल्याची कोणतीही नोंद आढळली नाही. आरोपी अब्बास अन्सारी आपल्या पत्नीच्या फोनवरून तुरुंगातून साक्षीदारांना धमकावत होता. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली.