राजकीय नेतेमंडळींकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. चित्रपटांमध्ये देखील राजकीय नेत्यांची पात्र आपल्याशी वाद घालणाऱ्याला अडचणीत आणत असल्याचे प्रसंग रंगवून दाखवले जातात. पण असाच एक सिनेस्टाईल प्रकार आंध्र प्रदेशातील तिरूपती विमानतळाच्या बाबतीत घडला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी एका आमदारपुत्रानं चक्क त्या विमानतळाचं आणि विमानतळ कर्मचारी राहात असलेल्या क्वार्टर्सचं पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हा आरोप संबंधित आमदारपुत्राने फेटाळून लावला असला, तरी विरोधकांनी मात्र यावरून आता वादाचं रान पेटवायला सुरुवात केली आहे.
नेमकं घडलं काय?
हा सगळा प्रकार घडला तो आंध्रप्रदेशमधल्या तिरूपती विमानतळावर. तिरूपतीच्या रेनिगुंटा विमानतळाचे व्यवस्थापक सुनील आणि तिरूपतीचे उपमहापौर अभिनय रेड्डी यांच्यात झालेल्या वादानंतर हे सगळं नाट्य घडून आलं. अभिनय रेड्डी हे आंध्र प्रदेशचे आमदार करुणाकर रेड्डी यांचे पुत्र आहेत. रेड्डी हे सत्ताधारी आघाडीतील युवाजन श्रमिक रयथू काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशचे मंत्री बोत्सा सत्यनारायण तिरुपती दौऱ्यावर आले होते. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेच्या सांगता समारंभासाठी ते आले होते. यावेळी त्यांच्यासोबत तिरुपती देवस्थानचे संचालक वाय व्ही सुब्बा रेड्डी देखील होते. त्यांचं स्वागत करण्यासाठी अभिनय रेड्डी विमानतळावर गेले होते. मात्र, व्यवस्थापकांनी अभिनय रेड्डी यांना विमानतळामध्ये प्रवेश नाकारला.
विमानतळावरच राडा
अभिनय रेड्डी आणि विमानतळ व्यवस्थापक सुनील यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेला. मात्र, तरीदेखील सुनील यांनी अभिनय रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर अभिनय तिथून माघारी फिरले. त्यानंतर या संपूर्ण विमानतळाचा आणि विमानतळ कर्मचारी राहात असलेल्या नजीकच्या क्वार्टर्सचा पाणीपुरवठा अचानक खंडित झाला. अभिनय रेड्डी हे तिरुपती पालिकेचे उपमहापौर असून त्यांनीच घडलेल्या प्रकाराचा वचपा काढण्यासाठी पाणीपुरवठा खंडित केल्याचं सांगितलं गेलं.
विरोधकांनी साधला निशाणा!
दरम्यान, तिरुपती पालिकेनं मात्र हे दावे फेटाळून लावत पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा दावा केला. दरम्यान, यासंदर्भात विमानतळ प्रशासन किंवा पालिका प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला, तरी विरोधी पक्ष असलेल्या तेलुगु देसम पक्षाचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी ट्विटरवरून अभिनय रेड्डी यांच्यावर टीका केली आहे.
“विमानतळ आणि कर्मचारी निवासस्थानाचा पाणीपुरवठा खंडित झाल्यावरून सत्ताधारी वायएसआरसी पक्षाची हुकुमशाही वृत्तीच दिसून येते. मी या प्रकाराचा तीव्र निषेध करतो”, असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. बऱ्याच उशीराने हा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याच सांगितलं जात आहे.