हरयाणातील चौथीच्या मुलाचे धक्कादायक कृत्य

सुरूवातीला लाड म्हणून दिल्यानंतर आपल्या मुलांना मोबाइलचे व्यसन लागल्याची तक्रार गेली काही वर्षे पालक करीत आहेत. मात्र हे व्यसन किती घातक ठरू शकते, याचे धक्कादायक उदाहरण हरयाणामध्ये घडले. मोबाइल हातातून ओढून घेतल्यामुळे स्वत:चाच हात एका चौथीतील मुलाने चाकूने कापून घेतला आहे.

नऊ वर्षांच्या या मुलाने अलीकडेच स्वयंपाकघरातील चाकूने मनगटाच्या वरील भागात कापून घेतल्याने झालेल्या जखमेच्या उपचारासाठी त्याला दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मोबाइल अधीनतेच्या प्रकरणांपैकी हे सगळ्यात कमी वयाचे उदाहरण आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजीव मेहता यांनी सांगितले. या मुलाचे वडील उद्योजक, तर आई प्राध्यापक आहे. त्यांना आपल्या मुलाकरिता फारसा वेळ देता येत नव्हता. हा मुलगा अगदीच लहान असताना आईवडिलांनी करमणुकीसाठी त्याच्या हाती मोबाइल सोपवला. हळूहळू त्याला याची सवय झाली. मोबाइल हाती असला, तरच तो जेवत असे. जेवताना तो त्यावर यूटय़ूब पाहत असे किंवा मोबाइलवर गेम खेळत असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षीपासून मुलाच्या वागण्यात काहीतरी चुकत असल्याची जाणीव आईवडिलांना झाली. मोबाइल फोन हातून काढून घेतला की मुलात राग आणि तणावाची लक्षणे दिसून येत. डोळ्यांतील त्राण कमी झाल्याने त्याला सतत डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. दृष्टीचा आणखी ऱ्हास होऊ नये म्हणून मुलाला मोबाइल फोन किंवा लॅपटॉप व टेलिव्हिजन यासारख्या ‘स्क्रीन’च्या संपर्कात येऊ देऊ नये, असा सल्ला पालकांना देण्यात आला, मात्र तोवर उशीर झाला होता.  मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला की तो विचित्र वागत असे आणि भयंकर चिडत असे. त्याच्या मनासारखे झाले नाही तर तो भिंतीवर डोके आपटून घेई. अखेर त्याने आपल्या मनासारखे घडावे म्हणून हात चाकूने कापून घेण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. मेहता यांनी सांगितले. डॉक्टर आता या मुलाला ‘जगण्याचे पर्यायी मार्ग’ सुचवत आहेत. त्याला नैराश्य कमी करण्यासाठी औषधे देण्यात येत असली, तरी त्याचे मोबाइलवरील अवलंबित्व बदलणे हा मुख्य उपचार आहे.