पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहार दौऱ्यात काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक करीत, रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी अनेक प्रकल्प राज्यात आणल्याचे मोदींनी स्पष्ट केले. देशातील सर्वात मोठय़ा दिघा-सोनपूरदरम्यानच्या सेतूचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. रेल्वे व रस्ता असा याचा वापर करता येणार आहे.

अटलबिहारी पंतप्रधान असताना तसेच नितीशकुमार रेल्वेमंत्री असतानाचे स्वप्न आता सत्यात उतरल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या कामाकडे पूर्वीच्या सरकारने दुर्लक्ष केले नसते तर सहा ते सात वर्षांमध्ये काम झाले असते असे मोदी म्हणाले. या कामासाठी ६०० कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज होता, मात्र वाढत तो तीन हजार कोटी रुपयांवर गेला. जनतेच्या पैशाचा हा अपव्यय असल्याचे मोदींनी सांगितले.

निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप होऊनदेखील मोदींनी नितीशकुमारांचे कौतुक केले. स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटूनही देशातील १८ हजार खेडय़ांमध्ये वीज पोहोचली नसल्याबद्दल त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली. केंद्राची ग्रामीण विद्युतीकरण योजना नितीशकुमार प्रभावीपणे राबवत असल्याचे कौतुक त्यांनी केले. पूर्वेकडील राज्यांच्या विकासाखेरीज देश पुढे जाऊ शकणार नाही असे सांगत, बिहारचा विकास महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्या १८ महिन्यांत ३४ टक्के काम पूर्ण केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान केंद्राने युवकांसाठी मोठय़ा दोन योजना आणल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पूर्वी नुसती भाषणे होत काही कृती होत नव्हती, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला. बिहार दौऱ्यात पंतप्रधानांनी पाटणा उच्च न्यायालयाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभाला हजेरी लावली.