जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या राज्यातील निवडणुकांसंबंधी वक्तव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसदेत नापसंती व्यक्त केली.
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका यशस्वी होण्यामागे पाकिस्तान, हुर्रियत कॉन्फरन्स आणि दहशतवाद्यांनी केलेले सहकार्य असल्याचे वक्तव्य करून मुफ्ती यांनी नव्या वादाला तोंड फोडले होते. राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर अनेक दिवस चाललेल्या घोळानंतर अखेर मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पीडीपी आणि भाजप या पक्षांचे युती सरकार स्थापन झाले आणि मुफ्ती यांनी रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर लगेचच दोन्ही पक्षांत या मुद्दय़ावरून वाद निर्माण झाला. त्यावर मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत उत्तर दिले.
अशा विधानांना आपला अजिबात पाठिंबा असणार नाही. कोणी तरी अशी विधाने करावी आणि आम्हाला येथे त्याचे खंडन करावे लागावे, हे चालणार नाही, असे मोदी म्हणाले.
राज्यातील यशस्वी निवडणुकांचे श्रेय तेथील जनतेला आहे, जिने मोठय़ा धैर्याने आणि अभिमानाने बहुसंख्येने बाहेर पडून मतदान केले आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनातील शंका दूर केल्या. दहशतवाद बिलकूल खपवून न घेण्याचे धोरण यापुढेही सुरू राहील आणि संसदेत संमत करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी सर्व ठरावांचे तंतोतंत पालन केले जाईल. राज्यात पीडीपीबरोबर समान सहमतीच्या मुद्दय़ांवर सरकार स्थापन झालेले आहे आणि त्या आधारावरच ते काम करत राहील, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi disapproves of mufti comments
First published on: 04-03-2015 at 12:50 IST