देशात स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी केंद्र सरकार आता अमेरिकेतील ‘शार्क टँक’च्या धर्तीवर एक रिएलिटी शो आणण्याच्या विचारात आहे. या माध्यमातून स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून दुरदर्शन आणि खासगी वाहिन्यांवर या शोचे प्रक्षेपण केले जाईल. या शोमध्ये नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.

अमेरिकेत नवोदीत उद्योजकांकरता ‘शार्क टँक’ हा रिएलिटी शो असून हा शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला होता. तुमच्या डोक्यातील कल्पना शोमधील चार ते पाच मोठ्या उद्योजकांसमोर मांडायची. त्यांच्याकडून जास्तीज जास्त भांडवल घेण्याचा प्रयत्न करायचा अशी या शोची संकल्पना आहे. या शोच्या धर्तीवर आता केंद्र सरकार भारतातही अशाच प्रकारचा रिएलिटी शो सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.
दुरदर्शन, खासगी वाहिन्या आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा शो दाखवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन या विभागाने या प्रकल्पाला तत्वतः मंजुरीही दिली आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारसमोर मुख्य अडचण आहे ती आर्थिक पाठबळाची. नॅसकॉमने केंद्र सरकारला या शोसाठी ६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार आणि प्रायोजकांकडून ३४ कोटी रुपये उभे करणे शक्य आहेत. पण उर्वरित ३० कोटींचा भार केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन देण्यापूर्वी केंद्र सरकारला आधी स्वतःसाठी आर्थिक पाठिंब्याची गरज आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने उच्छुक नवउद्योजकांकडून अर्ज मागवता येतील असे समजते. देशभरातून सुमारे १० हजार अर्ज सरकारकडे येतील असा अंदाज आहे. यातील २ हजार जणांची निवड पहिल्या फेरीसाठी केली जाईल. पहिली फेरी दिल्ली, चंदीगड, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई, बंगळुरु, इंदौर या शहरांमध्ये पार पडेल. यातील ४४० जणांची निवड केली जाईल आणि मग शेवटी ३५ जणांना प्रादेशिक स्तरावरील विजेते म्हणून घोषित केले जातील. या ३५ जणांना दुसऱ्या फेरीत प्रवेश दिला जाणार आहे. एक आठवड्यांच्या वर्कशॉपनंतर हे ३५ जण गुंतवणूकदारांच्या पॅनल समोर जातील. या पॅनलमधील मंडळींना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी या ३५ स्पर्धकांना प्रयत्न करावे लागतील. या फेरीचे दुरदर्शनवर प्रक्षेपण केले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.