मोदी सरकारची वाटचाल योग्य दिशेने!

हे सरकार सत्तेवर येऊन केवळ १४ महिने झाले आहेत.

रा. स्व. संघाचे प्रमाणपत्र ल्ल सरकारवर संघाचे थेट नियंत्रण- माकपची टीका

नरेंद्र मोदी सरकार बांधीलकी आणि समर्पणाच्या भावनेसह योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे प्रमाणपत्र भाजपसह घेतलेल्या तीन दिवसांच्या समन्वय बैठकीनंतर शुक्रवारी रा. स्व. संघाने सांगितले. आपण सरकारच्या नियंत्रकासारखे वागत असल्याची टीका संघाने फेटाळून लावली.
आपण सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत नसून, आपले स्वयंसेवक असलेल्या मंत्र्यांना केवळ माहिती दिली आहे आणि आपल्याला तो हक्क आहे, असा दावा संघाने केला.
हे सरकार सत्तेवर येऊन केवळ १४ महिने झाले आहेत. अजून बराच कालावधी असून बरेच काही करण्याचे बाकी आहे. आतापर्यंत जे काही झाले आहे त्याची दिशा योग्य असून सरकारची कामगिरी चांगली आहे. मात्र प्रत्येकाचा शंभर टक्के समाधान कधीच होऊ शकत नाही, असे संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तीन दिवसांच्या ‘समन्वय’ बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत व संघाचे नेते यांची सरकारमधील ज्येष्ठ मंत्री तसेच भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांशी थेट चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अखेरच्या दिवशी बैठकीत सहभागी झाले होते.
आम्ही सरकारची कामगिरी तपासून पाहात नाही, किंवा त्यांना काही संदेशही देत नाही. आम्ही फक्त माहितीची देवाणघेवाण करत आहोत, असे होसबळे म्हणाले.
संघ सरकार व मंत्र्यांना निर्देश देत आहे आणि मंत्री संघाला अहवाल देऊन गुप्ततेच्या शपथेचा भंग करत आहेत या टीकेबद्दल विचारले असता होसबले म्हणाले की, आम्ही काही बेकायदेशीर संघटना नाही, तर देशाचे नागरिकच आहोत. आमचे स्वयंसेवकही असलेल्या मंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा आम्हाला हक्क आहे. यात गुप्ततेचा प्रश्न कुठे येतो?
संघ नियंत्रकाच्या (रिमोट कंट्रोल) भूमिकेत काम करत असल्याच्या काँग्रेसच्या टीकेचा उलेल्ख केला असता होसबळे म्हणाले की, काँग्रेसच्या म्हणण्याला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. तेच स्वत: कुणाच्यातरी आदेशाने चालत आलेले आहेत. त्यामुळे आमच्याबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक हक्क नाही.
राम मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात विचारलेल्या प्रशनाच्या उत्तरात म्हणाले, की हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारच्या कालमर्यादेनुसार अयोध्येत राम मंदिर बांधले जाण्याची संघ वाट पाहील. ते बांधले जाईल याची आम्हाला आशा असून, भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची आम्ही वाट पाहू. या समन्वय बैठकीत कुठलीही धोरणे ठरवण्यात आली नाहीत, कारण ही धोरण निश्चित करणारी संस्था नाही. संघाची धोरणे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ठरवत असते, असे होसबळे म्हणाले.

‘हे तर सरकारवर वर्चस्व’
संघाबरोबरच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या कामाचे अहवाल सादर करण्याची त्यांची कृती लोकशाहीचा अपमान करणारी असून, संघ परिवाराचे सरकारवर ‘थेट नियंत्रण’ असल्याचे यातून स्पष्टपणे सिद्ध होते, अशी टीका माकपने केली आहे. संघ हा केवळ भाजपवर दुरून नियंत्रण ठेवत नाही, तर संघाची राजकीय संघटना असल्यासारखे वागणाऱ्या सरकारवर त्यांचे वर्चस्व आहे, असे पक्षाने एका निवेदनात सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modi government doing well