“काँग्रेस पक्ष ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांचे नाव जाहीर करायला तयार नव्हता. मात्र, राजदने त्यांच्या डोक्यावर देशी बंदूक (कट्टा) लावल्यानंतर ते त्यासाठी तयार झाले,” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. मोदी यांनी बिहारच्या भोजपूर आणि नवादा जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या रविवारी महत्त्वाचे नेते प्रचारात सहभागी झाले. पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतल्या.
मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये इंडिया आघाडीवर टीका करताना काँग्रेस आणि राजद या पक्षांमध्ये गंभीर मतभेद असल्याचा दावा केला. ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर हे मतभेद सर्वांसमोर येतील, असे ते म्हणाले.
एका युवराजांनी ‘व्होट अधिकार यात्रा’ काढली. त्यामुळे आपल्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे, असे ‘जंगल राज’च्या युवराजाला वाटले. त्यामुळे राजदने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उमेदवार जाहीर केला. निवडणूक संपू द्या, मग ते एकमेकांची डोकी फोडताना दिसतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
तेजस्वी सत्तेत आल्यास गुन्ह्यांसाठी स्वतंत्र खाते!
मुझफ्फरपूर : “राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मुलगा सत्तेवर आल्यास बिहारमध्ये खून, अपहरण खंडणी यासाठी मंत्र्यांची तीन स्वतंत्र खाती निर्माण केली जातील,” अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ‘रालोआ’ सत्तेत आल्यास राज्याला पूरमुक्त करू असे आश्वासन त्यांनी दिले. शहा यांनी रविवारी मुझफ्फरपूर आणि वैशाली जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या.
‘मोदींवर उद्योपतींचे नियंत्रण’
बेगुसराय, खगारिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत नाहीत तर अदानी आणि अंबानी या उद्योगपतींचेही त्यांच्यावर दुरून नियंत्रण आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. त्यांनी बेगुसराय आणि खगारिया जिल्ह्यांमध्ये पाठोपाठ जाहीरसभा घेतल्या. मोदींच्या ५६ इंची छातीच्या दाव्यावर टीका करताना राहुल म्हणाले, “मोठी छाती असल्याने कोणी मजबूत होत नाही. महात्मा गांधींकडे पाहा, ते अशक्त दिसत पण त्यांनी तेव्हाची महासत्ता असलेल्या ब्रिटिशांशी लढा दिला.”
