फिलाडेल्फियामध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरममध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे महनीय वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. तथापि, मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले भाषण करणार आहेत, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉण्टेकसिंग अहलुवालिया यांचेही भाषण होणार आहे. व्हार्टन स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या वतीने आयोजित ही कॉन्फरन्स भारतकेंद्रित असून ती विद्यार्थ्यांच्या वतीने चालविण्यात येते.
जवळपास १६ वर्षांपासून ही भारतकेंद्रित व्यापार कॉन्फरन्स भरविण्यात येत असून त्यामुळे नेत्यांना भारतात कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि आव्हानांचा कसा सामना करता येईल, ते स्पष्ट करणे सुलभ होते. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा, अदानी समूहाचे गौतम अदानी, अभिनेत्री शबाना आझमी, कवी जावेद अख्तर हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.