केवळ मोदी लाट पक्षाला राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकत नाही. मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यास मदत करू शकते, परंतु राज्यात निवडणूक जिंकायची असेल तर पक्षाला विकास कामे करावीच लागतील, असं मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी व्यक्त केले. रविवारी बेंगळुरूमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपाने आतापासूनच निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंतप्रधान मोदी केंद्रात खूप काम करत आहेत. पुढील निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान होतील. पण राज्यातील काँग्रेसला जाग आली आहे. विरोधी पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे आपण अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. बूथ स्तरापासून पक्षबांधणी करायला हवी, तरच आपण काँग्रेसला धडा शिकवू शकतो. हानेगल आणि सिंदगी मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे,” असंही येडियुरप्पा म्हणाले.

“आपण मोदींच्या नावाने केवळ लोकसभा निवडणुका जिंकू शकतो पण विधानसभा निवडणुका फक्त आपल्या कामांच्या आधारे जिंकल्या जाऊ शकतात,” असंही ते म्हणाले. शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, डीव्ही सदानंद गौडा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार काटील यांच्या नेतृत्वाखाली चार संघ आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि निवडणुकीतील संभाव्यता जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा करतील, तसेच पक्षाच्या उणीवांवर या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाई, असा निर्णय घेण्यात आला आहे. हा दौरा ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi wave alone cannot help to win election in karnataka says bs yediyurappa hrc
First published on: 21-09-2021 at 10:45 IST