अमेरिका व भारत हे त्यांच्या संबंधांमध्ये स्थित्यंतराच्या टप्प्यात पोहोचले असून, भारताशी दृढ संबंध प्रस्थापित करणे हे अत्यंत महत्त्वाचे असून तेथील नवीन सरकार त्यांना आणखी मजबुती प्राप्त करून देईल, अशी आशा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी व्यक्त केली. उच्चस्तरीय चर्चेसाठी ते भारत भेटीवर येत असून त्यापूर्वी त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेतील दूरदृष्टीचे कौतुक करताना ते म्हणाले, की त्यांच्या या दूरदृष्टीला आमचा पाठिंबा आहे.
‘सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस’ या अमेरिकेच्या विचारवंत गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, भारताच्या आर्थिक पुनरुज्जीवनात तेथील खासगी क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडण्यास इच्छुक आहे ही चांगली बाब आहे. आता अमेरिका सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करून नव्या शक्यता व संधी निर्माण करणे संवादाच्या माध्यमातून शक्य आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दोन्ही देशांतील भागीदारीचे वर्णन २१व्या शतकातील निर्णायक भागीदारी असे केले आहे ते योग्यच आहे, असे केरी म्हणाले.