अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं कालपासूनच एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसिन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला पण, हा माझी बदनामी करण्याचा आणि माझं करिअर उद्धवस्त करण्याचा डाव आहे, असं ट्विट करत मोहम्मद शमीनं या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला. या पोस्टमध्ये हसिनने काही मुलींचे फोटो, मोहम्मदबरोबर त्यांनी केलेलं अश्लिल संभाषण, या मुलींचे फोन नंबरही प्रसिद्ध केले होते. या फेसबुक पोस्टनंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची देशभर चर्चा होऊ लागल्यानंतर पोस्ट टाकल्यानंतर काही तासांतच हसिनच्या फेसबुकवरून काही फोटो आणि पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहे. हे प्रकरण तापल्यानंतर मोहम्मद शमीने ट्विट करत हा आपल्याविरुद्धचा कट असल्याचं म्हटलं आहे.

‘आमच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल जी काही चर्चा होत आहे ती पूर्णपणे खोटी आहे. कोणीतरी आमच्याविरुद्ध मोठा कट रचत आहे किंवा माझी बदनामी करण्याचा आणि माझा खेळ उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यानं ट्विटरवर केला आहे.’ मोहम्मद शमी आणि हसिनचं २०१४ साली लग्न झालं होतं. काही दिवसांपूर्वी शमीने मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिने केला होता.