Mohan Bhagwat at RSS 100 Years Dussehra Melava Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव आज (गुरुवार, २ ऑक्टोबर) नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कोविंद यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघस्वयंसेवकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेलं ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आत्मनिर्भर भारताचा संकल्प, त्यासह दिलेला स्वदेशीचा नारा यावर भाष्य केलं.
मोहन भागवत म्हणाले, “नुकतंच अमेरिकेनं जाहीर केलेलं धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. पण हे अवलंबित्व नाईलाजात बदलता कामा नये. कारण ही आर्थिक प्रणाली कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं जतन करावं लागेल, पण त्यात नाईलाज नसावा, सक्ती नसावी, आपली इच्छा असायला हवी.”
आर्थिक सामर्थ्य मोजक्या हातांमध्ये जाता कामा नये : सरसंघचालक
सरसंघचालक म्हणाले, “आर्थिक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. तरुण उद्योजक देशाला पुढे नेत आहेत. त्यांच्याकडे खूप जोश व उत्साह आहे. परंतु, विकासाच्या प्रचलित पद्धतीने श्रीमंत व गरिबांमधील अंतर वाढतं. आर्थिक सामर्थ्य हे काही मोजक्या हातांमध्ये एकवटतं. पर्यावरणाची हानी होते अमानवीयता वाढते. त्यामुळे आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावं लागेल.”
स्वदेशी व स्वालंबनाला पर्याय नाही : मोहन भागवत
“अमेरिकेने नुकतंच नवं टॅरिफ धोरण लागू केलं आहे. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असेल. परंतु, त्याचा इतर सर्वांनाच फटका बसतोय. त्यामुळे आपण इतर देशांवर अवलंबून राहून चालणार नाही. जग हे परस्पर अवलंबनावर चालतं, सगळ्यांनाच एकमेकांशी संबंध ठेवावे लागतात. परंतु, हे अवलंबन लाचारीत रुपांतरित होता कामा नये. जागतिक स्थिती कधी बदलेल, कशी बदलेल हे सध्या सांगता येणार नाही. मात्र हे अवलंबित्व माहिती असताना, जागतिक परस्पर संबंधांना महत्त्व देताना लाचार होऊन चालणार नाही. त्यासाठी स्वदेशी व स्वालंबनाला पर्याय नाही.”
मोहन भागवत म्हणाले, “आपल्याला स्वावलंबी जीवन जगावं लागेल, स्वदेशीचा वापर करावा लागेल. ते करत असताना आंतरराष्ट्रीय संबंध देखील जपावे लागतील.”