Mohan Bhagwat at RSS 100 Years Dussehra Melava Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव आज (गुरुवार, २ ऑक्टोबर) नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, भारत, आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय धोरणं, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, नेपाळ व बांगलादेशमधील सध्याची स्थिती, सोनम वांगचुक यांना झालेली अटक, पहलगाममधील दहशतवादी हल्ला यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच ते म्हणाले, “हिंदू शब्दावर कोणाचा आक्षेप असू नये.” तसेच ज्यांचा आक्षेप असेल त्यांच्यासाठी भागवत यांनी समानार्थी शब्द देखील सुचवले.
मोहन भागवत म्हणाले, “आपल्या एकतेचा आधार आपली भारतीय संस्कृती आहे. ती सर्वसमावेशक आहे. आपली संस्कृती सगळ्यांचा सन्मान व स्वीकार करण्याची शिकवण देते. संस्कृतीचं जतन सनातन काळापासून आजपर्यंत इथल्या हिंदू समाजाने केलं आहे, त्यामुळे कधीकधी त्या संस्कृतीला हिंदू संस्कृतीही म्हटलं जातं. भारतात या संस्कृतीला आवश्यक समृद्ध व सुरक्षित वातावरण मिळालं. पिढ्यानपिढ्या ही संस्कृती जतन व संवर्धन करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कष्ट घेतले आहेत, त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे. त्या संस्कृतीचं आचरण, आपल्या पूर्वजांचा गौरव, विवेकपूर्ण आचरण व आपल्या मातृभूमीची भक्ती हे सगळं मिळून आपलं राष्ट्रीयत्व तयार होतं.”
हिंदू शब्दावर आक्षेप घेणाऱ्यांना भागवतांनी सुचवले पर्यायी शब्द
सरसंघचालक म्हणाले, “सर्व विविधतेला एकत्र ठेवणारी आपली संस्कृती हीच आपली राष्ट्रीयता आहे. हीच आपली हिंदू राष्ट्रीयता आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप आहे, त्यांनी हिंदवी म्हणावं, भारतीय म्हणावं. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. पण या राष्ट्रीयतेचं स्पष्ट स्वरूप व्यक्त करणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे हिंदू. आपलं राष्ट्र राज्यावर आधारित नव्हतंच कधी. आपलं आपल्या पवित्र मातृभूमीवरील प्रेम, भक्ती एकत्रितपणे आपले राष्ट्रप्रेम निर्माण करते. आदराने सर्वांना एकत्र आणणारे हे हिंदू राष्ट्रप्रेम आपल्याला नेहमीच एकसंध ठेवत आलं आहे. आपल्याकडे ‘राष्ट्रराज्य’ (नेशन-स्टेट) ही संकल्पना नाही. राज्ये येतात आणि जातात, पण राष्ट्र कायम टिकते. आपण आपल्या एकतेचा हा पाया कधीही विसरता कामा नये.
संस्कृतीचे विवेकपूर्ण अनुकरण आवश्यक आहे : भागवत
“प्राचीन काळापासून भारताचे वैशिष्ट्य असलेली भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे. ती आपल्याला सर्व विविधतेचा आदर आणि सन्मान करण्यास शिकवते. भारतीय संस्कृती आध्यात्मिकता, करुणा, पवित्रता आणि तपश्चर्या अर्थात धर्म या गुणांवर आधारित आहे. या राष्ट्राचे पुत्र असलेल्या हिंदू समुदायाने पारंपारिकपणे ही संस्कृती त्यांच्या आचरणाने जपली आहे, म्हणूनच तिला हिंदू संस्कृती असेही म्हणतात. प्राचीन भारतात, ऋषीमुनींनी त्यांच्या तपस्वी ज्ञानाच्या, योगसाधनेच्या जोरावर ती जपली आहे. भारताच्या समृद्ध आणि सुरक्षित वातावरणामुळे त्यांना हे साध्य करता आले. आपल्या पूर्वजांच्या कठोर परिश्रम, त्याग आणि समर्पणामुळे ही संस्कृती भरभराटीला आली व आज आपल्यापर्यंत अखंड पोहोचली आहे. त्या चिरंजीवी संस्कृतीचे आचरण, आपल्या पूर्वजांचे आदर्श म्हणून संस्कृतीचे विवेकपूर्ण अनुकरण आवश्यक आहे.”
“हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या सर्वसामावेशी विचारसरणीचा प्रवर्तक”
“संपूर्ण हिंदू समाजाचे बळ संपन्न, सद्गुणी आणि संघटित स्वरूप ही या राष्ट्राच्या एकता, अखंडता, विकास आणि सुरक्षिततेची हमी आहे. हिंदू समाज हा या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज आहे, हिंदू समाज सर्वसमावेशक आहे. वर उल्लेख केलेली विविध नावे, रूपे पाहता, स्वतःला वेगळे मानणे आणि मानवांमध्ये विभाजन किंवा वियोग निर्माण करणे, हिंदू समाज ‘आपण आणि ते’ या मानसिकतेपासून मुक्त आहे, मुक्त राहील. हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या सर्वसामावेशी विचारसरणीचा प्रवर्तक तथा संरक्षक आहे. म्हणूनच, भारताला समृद्ध बनवणे, संपूर्ण जगाला त्याचे अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे.”
मोहन भागवत म्हणाले, “जगाला एक नवीन मार्ग दाखवू शकणाऱ्या धर्माचे रक्षण करताना, भारताला समृद्ध बनवण्याच्या संकल्पाने, संघ आपल्या संघटित कार्यबलाद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे. एक संघटित समाज स्वतःच्या बळावर आपली सर्व कर्तव्ये पूर्ण करतो. त्यासाठी इतर कोणालाही वेगळे काहीही करण्याची आवश्यकता भासत नाही.”