Mohan Bhagwat on RSS Registration : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त बंगळुरूमध्ये आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेला आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, “आम्हाला संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करायचं आहे. सर्वांना एकजूट ठेवणं हे आमचं लक्ष्य आहे, जेणेकरून आपण एका समृद्ध व मजबूत भारताची निर्मिती करू शकू.”
मोहन भागवत म्हणाले, “आम्हाला अशा हिंदू समाजाची निर्मिती करायची आहे जो जगाला धर्माचं ज्ञान प्रदान करू शकेल, जेणेकरून जग आनंदी राहील, जगात शांतता नांदेल. संघाने हे कार्य हाती घेतलं असून समाजाने त्यात भाग घेतला पाहिजे. त्यासाठी आम्ही हिंदू समाजाला तयार करत आहोत. आपलं केवळ एकच ध्येय आहे, ते ध्येय साध्य केलं की आपल्याला दुरं काहीही करायची गरज नाही.
हिंदू धर्माची नोंदणी झालेली नाही : मोहन भागवत
सरसंघचालक म्हणाले, “संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करणं हे आमचं एकमेव उद्दीष्ट आहे. आम्ही हे कार्य पूर्णत्वास नेऊ. त्यानंतर संघटित झालेला हिंदू समाज उरलेलं कार्य पूर्ण करेल. एक संघटित व मजबूत हिंदू समाज निर्माण करणं हे आमचं उद्दीष्ट आहे. दरम्यान, यावेळी भागवत यांना विचारण्यात आलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कधी नोंदणी का केली नाही? यावर ते म्हणाले, “अनेक गोष्टी नोंदणीकृत नाहीत. हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही.”
“…म्हणून आरएसएसला करातून सूट मिळाली आहे”
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मोहन भागवत यांनी आरएसएसला कर सवलत देण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना दावा केला की आयकर विभाग व न्यायालयांनी असं निरीक्षण नोंदवलं आहे की आरएसएस हा एक व्यक्तींचा समूह आहे आणि म्हणून आरएसएसला करातून सूट देण्यात आली आहे.
आरएसएसच्या नोंदणीबाबत मोहन भागवत काय म्हणाले?
तब्बल १०० वर्षांपूर्वी संघाची स्थापना झाल्याचा उल्लेख करत भागवत यांनी प्रश्न उपस्थित केला की आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ब्रिटीश सरकारकडे नोंदणी करायला हवी होती का? १९२५ साली संघाची स्थापना झाली होती. तसेच १९४७ साली आपल्या देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने नोंदणी करणं अनिवार्य केलं नव्हतं.
