नवी दिल्ली : ‘संघ कोणासमोर हात पसरत नाही, संघ स्वयंसेवकांची तपस्या, निष्ठा आणि समर्पणावर चालतो. म्हणूनच संघ स्वावलंबी आहे’, अशी ठाम भूमिका मंगळवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी ‘संघाचा १०० वर्षांचा प्रवास : नवे क्षितीज’ या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात मांडली.
दिल्लीतील विज्ञानभवनातील व्याख्यानमालेत मंगळवारी भागवत यांनी थेट कुठलेही राजकीय विधान केले नसले तरी, संघाच्या स्वावलंबनाचा उल्लेख करून मोदी-शहांच्या भाजपच्या कथित वर्चस्ववादाला अप्रत्यक्ष चपराक दिल्याचे मानले जात आहे. पायउतार होणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यश्र जे. पी. नड्डा यांनी भाजपला संघाची गरज नसल्याचे वादग्रस्त विधान केले होते. भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये संघाने आग्रही भूमिका घेतल्याचीही चर्चा होत आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये संघ प्रचारक राहिलेले सी. पी. राधाकृष्णन यांना भाजपला उमेदवारी द्यावी लागली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांचे संघाच्या स्वावलंबीपणाच्या विधानाला महत्त्व निर्माण झाले आहे.
संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त, संघाची भविष्यातील वाटचाल कशी राहील, संघासाठी नवी क्षितिजे काय असतील, याविषयावर भागवत बुधवारी मांडणी करणार आहेत. भागवत यांनी मंगळवारी संघाच्या स्थापनेमागील प्रयोजन, संघाचा अडथळ्यांनी भरलेला प्रवास, स्वातंत्र्यानंतर संघाची गरज, हिंदू म्हणजे नेमके कोण आदी विविध मुद्द्यांवर विवेचन दिले. ‘१०० वर्षानंतरही संघ नव्या क्षितिजावर बोलत आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे भारत. भारताला विश्वगुरू करण्यासाठीच संघाची निर्मिती झाली, भारताने विश्वात मोठे योगदान देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. विश्वात भारताला अग्रगण्य स्थान मिळाले पाहिजे’, असे आग्रही मत भागवत यांनी व्यक्त केले.
२०१८ मध्ये देखील भागवत यांनी दिल्लीतील विज्ञान भवनामधील तीनदिवसीय व्याख्यानमालेत, ‘या देशातील सगळ्यांचा डीएनए समान आहे’, असे विधान केले होते. त्याचा पुनरुच्चार भागवत यांनी सात वर्षांनी झालेल्या या व्याख्यानामध्येही केला.
हिंदू कोणाला म्हणायचे?
हिंदू, हिंदवी, सनातनी, भारतीय असे काहीही म्हटले तरी चालेल, हे सगळेच हिंदू आहेत, असा दावा भागवत यांनी केला. हिंदू विरुद्ध कोणी नाही. हिंदू म्हणजे सर्वसमाविष्ट. अनंताशी एक व्हा असा संदेश देणारा समाज म्हणजे हिंदू. एक ईश्वर मानणारा हिंदू नाही. त्याचा एक ग्रंथ नाही, गुरूही एक नाही. अनेक पंथ होते. या सगळ्यांना स्वीकारणारे लोक हिंदू. हिंदू म्हणजे आपल्या रस्त्याने (भक्तीमार्ग) जा, त्यावर श्रद्धा ठेवा, बदलू नका, दुसऱ्यालाही बदलू नका, दुसऱ्याचा अपमान करू नका, संघर्ष करू नका. ही संस्कृती ज्यांची ते हिंदू, असे भागवत म्हणाले.
संघर्ष नव्हे, समावेशक
हिंदूराष्ट्र हा शब्द ‘नेशन-स्टेट’ या अर्थाने वापरला जात नाही. आपले राष्ट्र होतेच. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण एक राष्ट्र आहे. एकाच संवेदनलशीलतेने एकमेकांशी जोडलेले आहे. तुर्क, इंग्रज इथे राजा झाले. अनेक राजे, अनेक व्यवस्था होत्या. पण, राष्ट्र एक होते. हिंदूराष्ट्राचा सत्तेशी संबंध नाही. न्याय सगळ्यांना समान असतो. प्रजेसाठी समान न्याय असतो. हिंदू राष्ट्रात आम्ही कोणाला सोडत नाही. विरोध करत नाही. हिंदूराष्ट्र प्रतिक्रियेतून आलेले नाही. म्हणून संघासारखे संघटन कोणाच्या विरोधात नाही. ते सर्वसमावेशक आहे, असे मत भागवत यांनी मांडले.
संघ का हवा?
भारताला दोनवेळा पारतंत्र्यातून जावे लागले. १८५७च्या उठावानंतर शसस्त्र क्रांतीचा विचार पुढे आला. सावरकर हे या विचारांचे दैदिप्यमान उदाहरण ठरते. काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्याची चळवळ झाली. आपला समाज रुढी-परंपरावादी असून त्याला आधुनिक बनवले पाहिजे, त्यासाठी सुधारणावादी आंदोलन झाले पाहिजे असाही विचार पुढे आला. चौथा विचार भारताने मूळ संस्कृतीच्या आधारे पुढे गेले पाहिजे हे सांगणारा होता. दयानंद सरस्वती, विवेकानंद यांनी प्रामुख्याने हा विचार मांडला. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा या चारही विचारांचा परिचय होता, अनुभव होता. याचारही विचारांच्या प्रभावानंतरही अपेक्षित भारत उभा राहू शकलेला नाही असे हेडगेवार यांना वाटत होते. टागोर म्हणतात त्याप्रमाणे समाजाची जागृती राजकारणातून होणार नाही. त्यासाठी स्वयंसिद्ध नेतृत्व लागते. देशासाठी जगण्या-मरण्यासाठी ‘नायक’ लागेल. खंडप्राय देशात गल्लीगल्लीत नायक झाला पाहिजे. त्यातून वातावरण निर्माण होते, मग, समाज बदलतो. असा समाज घडवण्यासाठी संघासारख्या राष्ट्रवादी संघटनेची गरज होती असे हेडगेवारांना वाटले. म्हणून संघाची निर्मिती झाली, असे भागवत यांनी सांगितले.

