SBI Bank Robbery in Karnataka: नेटफ्लिक्सवरील मनी हाईस्ट वेबसीरीज अनेकांना माहीत असेल. दरोडेखोरांची टोळी बँकेत घुसून सोन्याची लूट करते आणि तिथून यशस्वीरित्या पसारही होते, अशी या मालिकेची कथा. या लोकप्रिय मालिकेप्रमाणेच एक घटना सध्या कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यात घडल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील चादचान येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या पाच मास्कधारी दरोडेखोर घुसले आणि त्यांनी २० किलो सोनं, १ कोटींची रोकड घेऊन पळ काढला.
एसबीआयचे ब्रँच मॅनेजर तारकेश्वर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीन जण लष्करी जवानांच्या गणवेशात बँकेत शिरले. त्यांनी चालू खाते सुरू करण्यासाठी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून बँकेतील कर्मचारी आणि इतर ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांनी बांधून ठेवले. तसेच जीवे मारण्याची धमकी देत अलार्म वाजविण्यास विरोध केला. ब्रँचमधील रोकड आणि सोन्याचे लॉकर उघडण्यासाठी दबाव टाकला.
ब्रँच मॅनेजरने पुढे सांगितले की, दरोडोखोराने रोकड आणि लॉकरमधील सोन्याचे दागिने त्यांच्या बॅगेत भरले आणि पळ काढला. लुटलेल्या सोन्याची किंमत २० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राशी निघाले कनेक्शन
प्राथमिक चौकशीनुसार, दरोडेखोरांच्या टोळीने बोगस नंबर असलेली एक व्हॅन चोरीसाठी वापरली. त्यानंतर ते महाराष्ट्रातील पंढरपूरच्या दिशेने पळाले. सोलापूर जिल्ह्यात पोहोचल्यानंतर त्यांच्या व्हॅनचा अपघात झाला आणि यामुळे त्यांचे स्थानिकांशी खटके उडाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावर गाडी सोडून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी बोगस नंबरची इको व्हॅन दरोड्यासाठी वापरली होती. सोलापूरात एका दुचाकीला धडक दिल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढल्याची माहिती विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निबंर्गी यांनी सांगितले.