Canara Bank Gold Heist in Karnataka: कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या दरोड्याची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. हा दरोडा देशातल्या काही मोठ्या दरोड्यांपैकी एक मानला जात आहे. या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल ५२ कोटींचं सोनं लंपास केलं आहे. विजयपुराच्या मानागुली भागातील कॅनरा बँकेच्या शाखेत हा दरोडा पडला आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून नेमकं एवढं सोनं दरोडेखोरांनी बँकेच्या बाहेर नेलं कसं? याचा तपास कर्नाटक पोलीस घेत आहेत.

मानागुली शाखेत गेल्या महिन्यात २३ मे रोजी हा दरोडा पडला. दरोडेखोरांनी जाणूनबुजून २३ मे तारीख निवडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कारण त्या दिवशी शुक्रवार होता. दुसऱ्या दिवशी महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँकेला सुट्टी होती. रविवारीही बँक बंदच होती. थेट सोमवारी २६ मे रोजी बँक उघडल्यानंतर दरोडा पडल्याचं स्पष्ट झालं आणि एकच धावपळ उडाली. या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही.

सोनं नेमकं नेलं कसं?

पोलिसांनी बँकेची तपासणी केली असता बँकेतून तब्बल ५१ किलो सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केल्याचं उघड झालं. पण एवढा मोठा ऐवज दरोडेखोरांनी सोबत नेला कसा असेल? हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. या दरोड्यासंदर्भात विजयपुराचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निमबर्गी म्हणाले, “हे सोन्याचे दागिने २३ मे रोजी संध्याकाळी ६ ते २५ मे रोजी सकाळी ११.३० यादरम्यान चोरीला गेले असावेत. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी आम्ही आठ पथकं नियुक्त केली आहेत. आमचा अंदाज आहे की ६ ते ८ जणांनी मिळून हा दरोडा टाकला असावा”.

सारंकाही सुनियोजित होतं!

दरम्यान, ज्या पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आला, ते पाहता आधी बँकेची संपूर्ण माहिती घेऊन नंतर नियोजनबद्धपणे हा दरोडा टाकण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दुसरा शनिवार व रविवार बँक बंद असल्यामुळे दरोडेखोरांनी शुक्रवारचा दिवस निश्चित केला. चोरट्यांनी बँकेत शिरण्यासाठी बनावट चाव्यांचा वापर केला. अलार्म बंद केले. सीसीटीव्ही कॅमेरेही त्यांनी बंद केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज कुणाच्या हाती लागू नये, यासाठी थेट एनव्हीआरदेखील सोबत नेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्यांनी फक्त बँकेचे लॉकर उघडले आणि सोनं पळवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. चोरट्यांनी यावेळी एक काळ्या रंगाची बाहुलीदेखी लॉकर्सजवळ ठेवली. यातून कुणीतरी काळी जादू, विधी केल्याचं भासवण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता, अससं पोलीस म्हणाले.