वॉशिंग्टन : वेगाने पसरणारा ‘मंकीपॉक्स’ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे अमेरिकेने गुरुवारी घोषित केले.  अमेरिकेत सध्या सात हजारांहून अधिक नागरिकांना ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झाला आहे. आरोग्य आणीबाणी घोषित केल्याने या  रोगाचा सामना करण्यासाठी निधी, साधनसामुग्री उभारण्यास गती मिळेल.

ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, थकवा येणे, अंगावर अनेक ठिकाणी फोड येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाचे प्रमुख झेव्हियर बेसेरा यांनी सांगितले, की आम्ही या विषाणूच्या मुकाबल्यासाठी सर्वतोपरी तयारी करत आहोत. प्रत्येक अमेरिकन नागरिकाने ‘मंकीपॉक्स’ची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. मंकीपॉक्स प्रतिबंधक लशींच्या अपुऱ्या उपलब्धतेवर  बायडेन प्रशासनावर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीचा निर्णय घेण्यात आला. न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोसारख्या मोठय़ा शहरांतील आरोग्य केंद्रातर्फे सांगण्यात आले, की या लशींच्या दोन मात्रा पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत.  पहिल्या मात्रेचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यासाठी दुसरी मात्रा बंद करावी लागली. यापूर्वी, ‘व्हाईट हाऊस’तर्फे सांगण्यात आले, की त्यांनी अकरा कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा केला आहे. अमेरिकेत ‘मंकीपॉक्स’मुळे  अद्याप एकही मृत्यू झालेला नाही.