प्रेमिकांचा लाडका चंद्र अजूनही यौवनात आहे असे म्हणायला हरकत नाही, कारण त्याचे वय आपल्या कल्पनेपेक्षा १० कोटी वर्षांनी कमी आहे. चंद्राचे हे वय ४.४ अब्ज ते ४.४५ अब्ज वर्षे असावे असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे चंद्र एकदम दहा कोटी वर्षांनी तरूण झाला आहे.
लोकप्रिय सिद्धांतानुसार ४.५६ अब्ज वर्षांपूर्वी एक ग्रह पृथ्वीवर आदळून त्याचा जो टवका उडाला त्यातून चंद्राची निर्मिती झाली. तथापि नवीन संशोधनानुसार चंद्रावरील खडकांचे निरीक्षण केले असता ४.४ अब्ज किंवा ४.४५ अब्ज वर्षांपूर्वी हा जो ढिगारा अवकाशात पृथ्वीवरील आघातामुळे उडाला तो चंद्राच्या रूपात आला व त्याचे वय कमी आहे. संशोधकांच्या मते पूर्वी मानत होतो त्यापेक्षा चंद्र दहा कोटी वर्षांंनी तरूण आहे, ही माहिती फार मोलाची आहे कारण त्यामुळे आपले चंद्राबरोबरच पृथ्वीबद्दलचे ज्ञानही बदलणार आहे. चंद्राच्या निर्मितीचे अनेक परिणाम अजून अभ्यासले गेलेले नाहीत, असे सांगून रिचर्ड कार्लसन यांनी सांगितले की,महाआघातापूर्वी पृथ्वीचे स्वरूप वेगळे होते. त्याचे प्राथमिक वातावरण या आघाताने उडाले असावे. चंद्राच्या निर्मितीनंतर तिथे वितळलेल्या खडकांचे सागर होते असे म्हणतात. चंद्रावरील खडकांचे वय त्यामुळे ४.३६ अब्ज वर्ष आहे.
पृथ्वीवर ज्या खुणा आढळल्या त्यावरून आघाताची ती घटना ४.४५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असावी. त्यामुळेच संशोधकांकडे असलेल्या पुराव्यानुसार चंद्राची निर्मिती करणारा तो आघात १० कोटी वर्षे अगोदर झालेला आहे किंवा असावा.