महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घडय़ा होत्या, त्यामुळे तो वेगळय़ा पद्धतीने विचार करू शकत असे व त्यामुळेच तो प्रज्ञावंत झाला असा दावा आता वैज्ञानिकांनी केला आहे.
नोबेल विजेते वैज्ञानिक आइनस्टाइन यांचा मेंदू २४० भागांत विभागला असून हे भाग १९५५ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर वैज्ञानिकांना अभ्यासासाठी देण्यात आले. त्यातील अनेक नमुने नंतरच्या काळात हरवले. त्यामुळे शरीरशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या मेंदूविषयी फार लिहिले गेले नाही. वैज्ञानिकांनी आता त्याच्या मेंदूच्या छायाचित्रांचा वापर करून २४० भाग जुळवले असून त्याच्या मदतीने अभ्यास केला आहे असे ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तात म्हटले आहे.
रोगनिदानतज्ज्ञ थॉमस हार्वी याने आइनस्टाइनचा मेंदू काढून घेतला होता व त्याने त्याचे विभाग करून त्याची वेगळी वैशिष्टय़े सांगितली होती. आइनस्टाइनच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घडय़ा व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मानववंशशास्त्रज्ञ डीन फॉक यांनी फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीत जे संशोधन केले आहे त्या मेंदूच्या पालीत (लोब) अनेक गुंतागुंतीची वेटोळी होती. आइनस्टाइनच्या मेंदूच्या यापूर्वीच्या दोन अभ्यासात असे दिसून आले होते, की त्याच्या मेंदूतील आटय़ासारखे भाग हे त्याच्या प्रज्ञेचे खरे कारण असावे. फॉक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रेन नावाच्या नियतकालिकात असे म्हटले आहे, की आइनस्टाइनच्या मेंदूचे काही भाग हे मोठे होते जे चेहरा किंवा जीभ यांच्याकडे तसेच प्रमस्तिष्काकडे चेतासंवेदना तत्परतेने पाठवत असत. मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. तो मोटर कॉर्टेक्सचा वापर असामान्य विचारांसाठी करीत असे, या विधानावर आता नवीन प्रकाश पडणार आहे. आइनस्टाइनचा मृत्यू १८ एप्रिल १९५५ रोजी वयाच्या ७६व्या वर्षी अमेरिकेतील न्यूजर्सी येथे झाला होता. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More creases on brain of albert einsteins intellectual
First published on: 29-11-2012 at 04:49 IST