राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल सुरू केल्यानंतर आतापर्यंत तब्बल १ कोटी १० लाख फास्टॅग वितरीत करण्यात आले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार निरनिराळ्या फास्टॅग विक्री केंद्रांमधून आता पर्यंत १ कोटी १० लाख फास्टॅग देण्यात आले आहे.

दररोज दीड ते दोन लाख फास्टॅगची विक्री होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेला जनता स्वीकारत आहे, याचं हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया एका अधिकाऱ्यानं यावेळी दिली. याचाच परिणाम टोल वसुलीवर झाला असून दररोज होणारी टोल वसूली ४६ कोटी रूपयांवर पोहोचली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं १५ डिसेंबरपासून देशभरातील ५२३ टोल नाक्यांवर फास्टॅग सेवा सुरू करण्यात आली आहे. तसंच फास्टॅगच्या साहाय्यानं टोल वसूली सुरू करण्यात आली आहे. फास्टॅगद्वारे टोल वसूली सुरू केल्यानंतर फास्टॅगद्वारे टोल वसूली दररोज २४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसंच याद्वारे टोल भरण्यामध्ये प्रवाशांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रयत्नशील आहे. तसंच आतापर्यंत आलेल्या सुचनांवरही काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

कसा घ्याल फास्टॅग ?

* फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

* एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

* डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा

* टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.

* फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे.

फास्टॅगची उपलब्धता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहन चालकांना फास्टॅग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माय फास्टॅग अ‍ॅपवर उपलब्ध आहे. तर आयएचएमसीएल डॉट कॉम बेवसाईटवरही फास्टॅग मिळेल. याशिवाय भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉपरेरेशनच्या पेट्रोल पंपावरही टॅग मिळणार आहे. २२ बँकांच्या शाखांमध्येही याची सुविधा असेल. यात एसबीआय, आयसीआसीआय, अ‍ॅक्सिस बँकाच्या शाखांचा समावेश आहे. पेटीएम, अ‍ॅमेझानसारख्या ऑनलाइन पोर्टलवरही फास्टॅग मिळणार आहे. वाहनावर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल व टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातील. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल.

वाहनांवर फास्टॅग नसेल आणि तरीही फास्टॅगच्या मार्गिकेतून जात असाल तर दुप्पट टोल भरावा लागणार आहे. यासाठी फास्टॅग मार्गिकांवरही कर्मचारी तैनात असतील. वाहनावर टॅग नसेल, तर उपस्थित कर्मचारी दुप्पट टोल घेतील.