एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून पहिल्या चार टप्प्यांपेक्षा पाचव्या टप्प्यात पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केली.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांचे एकूण मतदान ६७.१८ टक्के झाले, तर पुरुषांचे मतदान ६७.०२ टक्के झाले. तुलनेने महिलांचे मतदान थोडे जास्त होते. या वेळी २० मे रोजी पाचव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. या टप्प्यात एकूण ६२.२० टक्के मतदान नोंदवले गेले. त्यापैकी पुरुष मतदारांचे मतदान ६१.४८ टक्के झाले, तर महिलांचे मतदान ६३ टक्के झाले. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये महिला मतदारांचे मतदान कमी नोंदवले गेले. या टप्प्यात मतदान झालेल्या ४९ मतदारसंघांपैकी २४ मतदारसंघांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण जास्त होते, त्यापैकी २२ मतदारसंघांमध्ये २०१९ मध्येही हाच कल नोंदवला गेला होता.
निवडणूक आयोगाच्या मते पाचव्या टप्प्यात ८.९५ कोटी मतदार मतदानास पात्र होते. त्यापैकी ४.९६ कोटी पुरुष, ४.२६ कोटी महिला आणि ५,४०९ तृतीयपंथींचा समावेश होता.
हेही वाचा >>>Video: ‘गरा-गरा फिरत हॅलिकॉप्टर जमिनीवर पडलं’, हृदयाचे ठोके चुकविणारी केदारनाथची घटना; प्रवाशी सुरक्षित
बिहार, झारखंडमध्ये आघाडी
विशेष म्हणजे बिहार, झारखंड या राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी अधिक मतदान केल्याचे दिसून आले. बिहारमध्ये ५३.४२ टक्के पुरुषांचे मतदान झाले, तर ६१.५८ टक्के महिलांनी मतदान केले. झारखंडमध्ये ६८.६५ महिला, तर ५८.०८ पुरुषांनी मतदानाचा अधिकार बजावला. झारखंडमधील कोडरमा मतदारसंघात ५४.१५ पुरुषांनी, तर ७० टक्के महिलांनी मतदान केले. मतदानातील हा फरक १५.४८ टक्के इतका जास्त होता.
जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी महिलांनी मतदान केले, मात्र बिहार, झारखंडमध्ये अधिक महिलांनी मतदान केले, असे निवडणूक आयोगाने सांगितले.
या मतदारसंघांत महिलांचे मतदान अधिक
● बिहार : सीतामढी, मधुबनी, मुझफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर ● झारखंड : चतरा, कोडरमा, हजारीबाग ● उत्तर प्रदेश : रायबरेली, अमेठी, बांदा, फतेहपूर, कौशांबी, फैजाबाद, कैसरगंज, गोंडा, बनगाव ● पश्चिम बंगाल : हुगळी, उलुबेरिया
महिलापुरुष मतदान
पुरुष महिला फरक एकूण मतदान
टप्पा १ ६६.२२ ६६.०७ ०.१५ ६६.१४
टप्पा २ ६६.९९ ६६.४२ ०.५७ ६६.७१
टप्पा ३ ६६.८९ ६४.४१ २.४८ ६५.६८
टप्पा ४ ६९.५८ ६८.७३ ०.८५ ६९.१६
टप्पा ५ ६१.४८ ६३.०० १.५२ ६५.२०