पनामा पेपर्स प्रकरणाशी संबंधित मोझॉक फोन्सेका या विधी सल्लागार कंपनीच्या मुख्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. या कंपनीने जगातील बडय़ा राजकीय व्यक्ती व इतर अनेकांना परदेशात बेनामी कंपन्या व खाती सुरू करण्यास मदत केली आहे. संघटित गुन्हेगारी खात्याच्या पोलिसांनी पनामा सिटी येथे कंपनीच्या मुख्यालयासह इतरत्र छापे टाकून तपास केला. अभियोक्तयांनी सांगितले की, छाप्यांमध्ये कुणीही हस्तक्षेप केला नाही. त्यात काय सापडले हे सांगण्यात आले नाही. पनामा पेपर्स कागदपत्रे मोझ्ॉक फोन्सेका कंपनीच्या संगणकातून हॅकर्सनी मिळवली आहेत व ती परदेशातून हॅक करण्यात आली. गेल्या ४० वर्षांतील २,१४,००० परदेशी आस्थापनांची कागदपत्रे पत्रकारांनी तपासली होती. हा अमेरिकेचा कट असल्याचा आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे आठ नातेवाईक या प्रकरणात असल्याने त्या देशात ऑनलाईन बातम्या बंद करण्यात आल्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या वडिलांनी परदेशात कंपनी काढली होती त्याचा लाभ त्यांना झाल्याने त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आहे.