दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमुळे सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये भारताला मोठे यश मिळाले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने  दिलेल्या वृत्तानुसार हिज्बुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू या चकमकीमध्ये ठार झाला आहे. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिज्बुल मुजाहिद्दीनने रियाजला कमांडर म्हणून नियुक्त केलं होतं. भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणाऱ्याला १२ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी (६ मे २०२०) सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. एका ठिकाणी भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तर दुसरीकडे हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज याला कंठस्थान घालण्यासाठी भारतीय सुरक्षादलांनी येथील एका परिसराला वेढा घातला होता. याचवेळी झालेल्या चकमकीमध्ये रियाज मारला गेला.

कोण होता रियाज?

रियाज हा सोशल मिडिया हाताळण्यात माहीर होता. सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांनी माथी भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेण्याचे काम रियाज करायचा. सुरक्षा दलांनी रियाजचा समावेश ए प्लस प्लस कॅटेगरीच्या दहशतवादींच्या यादीमध्ये केला होता. म्हणजेच रियाज हा सर्वात धोकायदाक आणि सक्रीय दहशतवाद्यांपैकी एक होता. अनेकदा सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तो थोडक्यात बचावला होता. अनेकदा त्याने व्हिडिओ मेसेजेसच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यासंदर्भात इशारे जारी केले होते.

रविवारी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह तीन जवान असे एकूण पाच जण शहीद झाले होते. दुसऱ्याच दिवशी (सोमवारी) हंदवाडा येथे चेकपॉईंटवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले. पुढच्या काही दिवसात दहशतवाद्यांविरोधात आणखी मोठया प्रमाणावर ऑपरेशन्स करण्याचे संकेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिले आहेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most wanted hizbul terrorist riyaz naikoo killed in awantipora encounter scsg
First published on: 06-05-2020 at 12:28 IST